सध्याची पंचवार्षिक राज्यासाठी सर्वात वाईट; बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई : मंत्री गुलाबराव पाटील अर्थमंत्र्यांबाबत जे बोलले ते बरोबरच असून त्याचे मी समर्थन करतो. केवळ महायुतीतच नाही तर आघाडीचे सरकार असतानाही अर्थ खात्याने मनमानी कारभार केला, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता नोंदवले. याशिवाय राज्यातील या पाच वर्षांतल्या राजकारणाची सर्वात दुर्दैवी राजकारण म्हणून इतिहासात नोंद होईल अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत असतानाच उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी ते म्हणाले की, आपण स्वतः आठ पंचवार्षिक पाहिलेल्या आहेत. दुर्दैवाने सध्याची पंचवार्षिक राज्यासाठी सर्वात वाईट ठरली. राज्याच्या हिताचा विचार न करता सत्तेच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले. राजकारणाचा घसरलेला हा स्तर मोठा वैचारिक वारसा लाभलेल्या राज्यासाठी भूषणावह नाही.
अर्थ खात्याचे काम पाचही वर्षांत कधीही न्यायाचे झाले नाही. वास्तविक तुमच्याकडे अर्थ खाते म्हणजे सगळे तुमचेच असे समजण्याचे कारण नसते. सर्व राज्याला समान न्याय या तत्त्वाने कारभार न करता फक्त आपल्या मर्जीतल्या लोकांना वारेमाप निधी दिला गेला. मात्र या विकासकामांतही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोपही थोरात यांनी केला.
भाजपमुळेच फडणवीस चक्रव्युहात
देवेंद्र फडणवीस चक्रव्युहात फसल्याबाबतच्या विधानाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. आज जी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे ती त्यांच्याच पक्षाने आणली आहे. राज्यात नको ते उद्योग करण्याची जबाबदारी भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्यावर टाकली. पण शेवटी फडणवीसच अडचणीत आले हे आजची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे पक्ष फोडाफोडीचे त्यांचे राजकारण महाराष्ट्रातील जनतेलाही आवडलेले नाही.





