T-20 World Cup | चहर, अय्यर व किशनला स्थान मिळणार का?, विश्वकरंडकासाठी लवकरच…

मुंबई – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या संघात दीपक चहर, श्रेयस अय्यर व इशान किशन यांच्यासह अन्य काही नवोदित खेळाडूंना स्थान मिळणार का याची उत्सूकता आहे.
भारतीय संघ सध्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळत असून सुपर-4 मध्ये संघाने स्थान निश्चित केले आहे. मात्र, ही स्पर्धा आगामी विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम समजली जात असल्याने या स्पर्धेतील कामगिरीचा विश्वकरंडक संघात स्थान मिळवण्यासाठी कोणाला लाभ होणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सर्व देशांच्या संघांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत संघ जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारीच संघ जाहीर केला असून अन्य संघही येत्या दहा दिवसांत जाहीर केले जाणार आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेची तयारी म्हणून आशिया करंडक स्पर्धेत खेळत आहे. त्यामुळे विश्वकरंडक स्पर्धेत कोणत्या खेळाडूला संधी मिळणार हे महत्त्वाचे आहे. आशिया स्पर्धेतील भारतीय संघाचा समतोल पाहिला तर केवळ 2 किंवा 3 खेळाडूंच्याच बाबतीत चर्चा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
भारतीय संघाकडे सेकंड बेंचमध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे या 15 खेळाडूंचे स्थान निश्चित आहे असेही निश्चित नाही. श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक, दीपक चहर, रवी बिष्णोई, इशान किशन या खेळाडूंच्या नावांची चर्चा होणे अपेक्षित आहे. अर्था यातील कोणाला संधी मिळणार याकडेही लक्ष लागले आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील भारताचे सामने
– भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर (मेलबर्न)
– भारत विरुद्ध अ गट उपविजेता, 27 ऑक्टोबर (सिडनी)
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर (पर्थ)
– भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर (ऍडलेड)
– भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर (मेलबर्न)
संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, यजुवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, दीपक हुडा.





