कृषक : सीड पेलेटायझेशन
सध्या पावसाचा वेग मंद असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नाही, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. अशा स्थितीत तेलंगणातील शेतकर्यांनी ‘सीड पेलेटायझेशन’चा वापर करून आदर्श निर्माण केला आहे.

– नवनाथ वारे
सध्या पावसाचा वेग मंद असल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नाही, त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. अशा स्थितीत तेलंगणातील शेतकर्यांनी ‘सीड पेलेटायझेशन’चा वापर करून आदर्श निर्माण केला आहे.
पूर्ण जून महिना संपला, तरी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा वेग मंद आहे. यामुळे जमिनीतील ओलावा कमी होण्याची चिंता सातत्याने व्यक्त केली जात आहे. परिणामी पेरण्या खोळंबल्या आहेत. संपूर्ण राज्यामध्ये हवामान बदलाच्या आणि दुष्काळाच्या या संकटावर नकारात्मक चर्चा सुरू असताना, तेलंगणातील थोगुटा मंडळातील बम्मदपल्ली गावातील शेतकर्यांनी मात्र या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याचा एक अनोखा मार्ग शोधला आहे. त्यांनी आपल्या पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी एका अत्यंत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.
निश्चित पाऊस कधी पडेल याचा नेम नसताना, येथील शेतकर्यांनी ‘सीड पेलेटायझेशन’ म्हणजेच बियाण्यांचे गोळीकरण करण्याचे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. हे तंत्रज्ञान बियाण्यांना पुरेसा पाऊस पडेपर्यंत सुरक्षित आणि जिवंत ठेवण्यास मदत करते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, एल निनोच्या परिस्थितीमुळे अनेकदा पाऊस लांबतो, दोन पावसाच्या नक्षत्रांमध्ये मोठा खंड पडतो आणि जमिनीतील ओलावा वेगाने कमी होतो.
अशा प्रतिकूल परिस्थितीचा थेट फटका बियाण्यांच्या रुजण्यावर आणि पिकाच्या वाढीवर होतो. या आव्हानांवर मात करण्यासाठी बम्मदपल्ली येथील शेतकरी विशेष पद्धतीने तयार केलेल्या बियाण्यांच्या गोळ्यांचा वापर करत आहेत. या गोळ्या पाऊस नसतानाही सुरक्षित राहतात आणि जेव्हा जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध होतो, तेव्हाच त्यातून अंकुर फुटतो.
या वैशिष्ट्यपूर्ण गोळ्या तयार करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत नैसर्गिक आणि पारंपरिक ज्ञानावर आधारित आहे. सुरुवातीला बियाण्यांवर ‘बीजामृत’ संस्कार केले जातात. त्यानंतर या संस्कारित बियाण्यांवर चिकन माती, ‘घनजीवामृत’ पावडर आणि लाकडाच्या राखेचे एकामागून एक असे थर चढवले जातात. या प्रक्रियेमुळे बियाण्यांचा मूळ आकार सामान्य आकारापेक्षा तीन ते पाच पटीने मोठा होतो. या माती आणि जीवामृताच्या थरांमुळे तयार झालेल्या गोळ्या पक्षी, उंदीर आणि किडींपासून बियाण्यांचे संरक्षण करण्यासाठी एक भक्कम सुरक्षा कवच म्हणून काम करतात.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, अवघा 10 ते 15 मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला तरी या गोळ्यांमधून अंकुर फुटू शकतो. समजा पाऊस पडलाच नाही, तर अत्यंत कमी ओलावा असलेल्या जमिनीतही या गोळ्या सलग 6 महिन्यांपर्यंत सुरक्षित आणि जिवंत राहू शकतात. एकदा का या गोळ्यांमधून अंकुर बाहेर आला की, त्यानंतर येणारे छोटे रोप पुढील 25 ते 40 दिवसांपर्यंत पाण्याचा ताण सहन करू शकते. त्यामुळे वारंवार दुष्काळाचा सामना करणार्या आणि कोरडवाहू क्षेत्रांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत वरदान ठरत आहे.
हवामान बदलाच्या या काळात शेतकर्यांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी कृषी विस्तार अधिकारी (एईओ) नागार्जुन यांनी बम्मदपल्ली गावातील शेतकरी गंधम राजीरेड्डी यांच्या शेतावर एका विशेष जनजागृती आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना नागार्जुन यांनी सांगितले की, चांगल्या उगवण क्षमतेसाठी, पिकाची शेतात समान वाढ होण्यासाठी आणि भविष्यात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी या बियाण्यांच्या गोळ्या जमिनीत साधारणपणे 5 सेंटीमीटर खोलीवर पेरल्या पाहिजेत.
या तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद करताना नागार्जुन पुढे म्हणाले की, पेलेटायझेशनच्या प्रक्रियेत बियाण्याभोवती चढवलेला चिकन मातीचा थर हा एका छोट्या स्पंजसारखे काम करतो. हा थर जमिनीतील अत्यंत सूक्ष्म ओलावा देखील स्वतःमध्ये शोषून घेतो आणि जोपर्यंत योग्य पाऊस पडत नाही, तोपर्यंत बियाणे सुरक्षित ठेवतो. या गोळ्यांमध्ये वनस्पती वाढवणारी संप्रेरके (ग्रोथ रेग्युलेटर्स), उपयुक्त जिवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील मिसळता येतात.
यामुळे बियाण्यातून येणार्या रोपांची मूळ संस्था अत्यंत मजबूत होते आणि ती जमिनीच्या खोल भागातून ओलावा खेचून घेण्यास सक्षम बनते. बर्याचदा मान्सूनच्या सुरुवातीला एकदाच हलका पाऊस पडतो आणि नंतर मोठा खंड पडतो. अशा वेळी सामान्य बियाणे लगेच अंकुरित होते आणि नंतर पाऊस न पडल्याने जळून जाते. परंतु, या तंत्रज्ञानामुळे बियाणे अशा फसव्या पावसाला बळी पडत नाही. जेव्हा जमिनीत सलग आणि पुरेसा ओलावा निर्माण होतो, तेव्हाच बियाणे रुजते, ज्यामुळे दुबार पेरणीचे संकट पूर्णपणे टळते.
कृषी अधिकार्यांच्या माहितीनुसार, पेलेटायझेशनमुळे सर्व बियाण्यांचा आकार आणि वजन एकसारखे होते. यामुळे आधुनिक ट्रॅक्टर संचलित पेरणीयंत्रे किंवा ड्रोनच्या साहाय्याने अचूक अंतरावर पेरणी करणे अत्यंत सोपे होते. सध्या कृषी विभागाकडून कोरडवाहू शेतीची शाश्वतता वाढवण्यासाठी आणि अनिश्चित हवामानात तुरीसारख्या पिकांचे उत्पादन सुधारण्यासाठी शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर हे तंत्रज्ञान वापरण्याचे आवाहन केले जात आहे.
सध्या सर्वजण एल निनोच्या दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करत आहेत, मात्र या तंत्रज्ञानामुळे शेतकरी आता निश्चिंत झाले आहेत. पुरेसा पाऊस पडल्यावरच बियाणे रुजणार असल्याने शेतकर्यांचे कष्ट, पैसा आणि वेळीची मोठी बचत होणार आहे.





