CSK vs MI Rohit Sharma : रोहित शर्मा १८ वर्षांत १८ व्यांदा खाते उघडण्यात अपयशी! नकोशा यादीत पोहोचला पहिल्या स्थानी

CSK vs MI Rohit Sharma equals Embarrassing record after scoring duck : गेल्या १० महिन्यांत भारताला टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माचे आयपीएलमध्ये अजिबात चांगले पुनरागमन झाले नाही. हंगामातील त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात, मुंबईचा राजा रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आणि पहिल्याच षटकात खाते न उघडता बाद पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह, रोहितने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर (डक) बाद होण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
रोहित शर्माने लाजिरवाण्या विक्रमात केली बरोबरी –
पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर २७ वर्षीय वेगवान गोलंदाज खलील अहमदने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. रोहितने मिडल स्टंपवर गुड लेन्थचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण मिडविकेटवर शिवम दुबेने त्याला झेलबाद केले. यानंतर बाहेर जाताना रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. रोहितने आयपीएलमध्ये १८ व्यांदा शून्यावर विकेट गमावली आहे. तो एका लज्जास्पद क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो संयुक्तपणे आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू बनला आहे.
Rohit Sharma dismissed for a 4 ball duck. pic.twitter.com/cs5YUULlWB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2025
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल देखील आयपीएलमध्ये प्रत्येकी १८ वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. पियुष चावला आणि सुनील नरेन प्रत्येकी १६ डकसह संयुक्तपणे यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच्यानंतर राशीद खान (१५), मनदीप सिंग (१५), मनीष पांडे (१४) आणि अंबाती रायुडू (१४) यांचा क्रमांक लागतो.
हेही वाचा – SRH vs RR : हैदराबादचा पहिल्याच सामन्यात राजस्थानवर दणदणीत विजय, इशान-ट्रॅव्हिस ठरले विजयाचे शिल्पकार
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, सीएसकेने एमआयविरुद्ध नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने १०० धावाच्या ५ विकेट्स गमावल्या. यष्टीरक्षक रायन रिकेल्टन आणि विल जॅक्स यांनाही आपली छाप पाडण्यात अपयश आले. रिकेल्टनने ७ चेंडूत ३ चौकारांसह १३ धावा केल्या आणि तिसऱ्या षटकात तो खलीलचा बळी ठरला. दरम्यान, अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने पाचव्या षटकात जॅकला त्याच्या जाळ्यात अडकवले. जॅकने ७ चेंडूत ११ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव २९, तिलक वर्मा ३१ आणि रॉबिन मिन्झ ३ धावा काढून स्वस्तात बाद झाले.





