कच्चे तेल 38 टक्क्यांनी स्वस्त झाले पण जनतेची लूट सुरूच – कॉंग्रेस

नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षांत कच्चे तेल स्वस्त झाले (Crude oil Price) असले तरी त्याचा लाभ जनतेला न देता इंधनदराच्या बाबतीत जनतेची लूट सुरूच आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर एक मीडिया रिपोर्ट शेअर केला आहे ज्यात त्यांनी दावा केला आहे की कच्च्या तेलाच्या किमती ३८ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत पण त्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जात नाही.
हिंदीतील एका पोस्टमध्ये रमेश म्हणाले, अलीकडेच पंतप्रधान महागाई आणि इतर विषयांवर संसदेत प्रवचन देत होते. पण त्यांच्या सरकारचा हा पराक्रम बघा. २ वर्षांत कच्चे तेल ३८ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे, पण त्यातून लोकांची लूट सुरूच आहे.
रमेश म्हणाले की, जनतेकडून पैसा लुटला जात आहे आणि तो मोदींच्या भांडवलदार मित्रांच्या खिशात टाकला जात आहे असे जे विधान राहुल गांधींनी केले आहे ते यावरून पुन्हा एकदा खरे ठरले आहे. हा स्पष्टपणे देशातील जनतेवर अन्याय आहे. आम्ही भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांच्या अन्याया विरोधात आवाज उठवत आहोत, असे ते म्हणाले.





