CRPF ची नक्षलींविरोधात निर्णायक लढ्याची तयारी; छत्तीसगढला पाठवणार 4 हजार जवान

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) नक्षलवाद्यांविरोधात निर्णायक लढ्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून सीआरपीएफ आपल्या 4 पलटण म्हणजे सुमारे 4 हजार जवानांना छत्तीसगढला पाठवणार आहे. देशाला मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त बनवण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे.
तो संकल्प पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशातून सीआरपीएफ सज्ज झाले आहे. त्या दलावर अंतर्गत सुरक्षेची आणि नक्षलीविरोधी मोहिमांची जबाबदारी आहे. झारखंड आणि बिहार छया राज्यांमधील नक्षलींच्या हालचाली अत्यल्प स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे झारखंडमधील ३ आणि बिहारमधील 1 पलटण सीआरपीएफने मागे घेतली आहे. त्या पलटण आता छत्तीसगढमध्ये तैनात होतील.
त्या राज्यातील बस्तर विभाग सर्वांधिक नक्षग्रस्त मानला जातो. प्रामुख्याने त्या विभागात सीआरपीएफच्या पलटण सक्रिय होतील. छत्तीसगढमध्ये आधीपासूनच तैनात असणाऱ्या सीआरपीएफ जवानांचे बळ अतिरिक्त पलटण दाखल झाल्याने वाढेल. छत्तीसगढला लागून असणाऱ्या ओडिशा, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा सीमांवरील दुर्गम भागांत त्या पलटण तैनात केल्या जाणार असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात छत्तीसगढमधील नक्षलीविरोधी मोहिमांची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.





