योगेश खाडे निघोज – निसर्गाच्या कुशीत वसलेले पर्यटनाचे नवे केंद्र पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटनस्थळ हे सध्या जिल्ह्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे. दिवाळी सुट्ट्यांचा हंगाम, आठवड्याच्या शेवटी येणाऱ्या सुट्ट्या आणि सोशल मीडियावर वाढलेली प्रसिद्धी यामुळे निघोज कुंडावर देशभरातून तसेच राज्यातील विविध भागांतून पर्यटकांची गर्दी होत आहे. या कुंडाची नैसर्गिक रचना, खोल दरीतील वाहते पाणी आणि शांत वातावरण यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळतो. सकाळी आणि संध्याकाळी कुंड परिसरात घेतलेले छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या ठिकाणाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. निघोज कुंड परिसराचा विकास करण्यासाठी खासदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून आणि स्थानिक प्रशासनाच्या पाठबळातून विविध विकासकामांना गती मिळाली आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत कुंड परिसरात मजबूत सुरक्षा ग्रील, पायऱ्यांची बांधणी, सोलार लाईट्स, फोटोपॉईंट, पार्किंग व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव मिळत असून स्थानिक ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे स्वच्छतेवर विशेष भर दिला जात आहे. या वाढत्या पर्यटनामुळे निघोज गावातील युवक व महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. गावातील अनेक युवक पर्यटन मार्गदर्शक, फोटोग्राफर, तसेच खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाशी जोडले गेले आहेत. हातगाडी, चहाचे स्टॉल, तसेच स्थानिक उत्पादने विकणाऱ्या छोट्या दुकानांमुळे गावाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. सुट्टीच्या दिवशी येथे हजारो पर्यटक गर्दी करत असल्याचे चित्र दिसते. निसर्गप्रेमी, फोटोग्राफीचे शौकीन तसेच कुटुंबासह विश्रांतीसाठी येणारे नागरिक या परिसरात वेळ घालवत आहेत.कुंड परिसरातील हिरवाई, स्वच्छता आणि प्रशासनाचा प्रयत्न यामुळे निघोज आज पारनेर तालुक्याचे पर्यटनाचे केंद्रबिंदू बनले आहे. निसर्गाचा खजिना जपण्याची जबाबदारी आपलीच स्थानिक ग्रामस्थांचा आग्रह आहे की, पर्यटकांनी प्लास्टिक, कचरा किंवा ध्वनीप्रदूषण टाळावे, कारण हे ठिकाण केवळ पर्यटन नव्हे तर निसर्ग संवर्धनाचे प्रतीक आहे. प्रशासनानेही येथे सूचना फलक, पोलीस गस्त आणि स्वच्छता मोहिम सुरू ठेवली आहे.