Pune District : विजयस्तंभ अभिवादनस्थळी गर्दीचा भीमसागर

कोरेगाव भीमा : देशभरातील आंबेडकर अनुयायींचे स्फूर्तीस्थान असलेले कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे (दि.१) जानेवारी २०२५ रोजी २०७ व्या शौर्य दिनी विजयस्तंभ अभिवादनानिमित्त देशभरातून लाखोंचा भीमसागर एकवटला होता. हातामध्ये निळे झेंडे घेत, जय भीमचा नारा देत होता. त्यामुळे विजयस्तंभ परिसर जय भीमच्या नाऱ्यासह गर्दीने दूमदुमून गेला होता.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ येथे दि. १ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून विजय स्तंभ परिसरात फटाक्यांच्या आतषबाजी आणि विद्युत रोषणाईत न्हाऊन निघाला होता. शौर्य दिनास जल्लोषात सुरुवात झाल्यानंतर भीम अनुयायांनी हजेरी लावत अभिवादन केले. अभिवादनासाठी राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे, संजय बनसोडे, नितीन राऊत, राजकुमार बडोले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लीकन पिपल पार्टीचे जोगेंद्र कवाडे, बामसेफचे वामन मेश्राम, भीमराज आंबेडकर, भीम आमीर्चे संस्थापक चंद्रशेखर आझाद, जितेंद्र आव्हाड, माजी आमदार प्रकाश गजभिये यांसह देशभरातील मान्यवरांनी याठिकाणी अभिवादन केले.
कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड, सर्जेराव कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. राज्यासह परदेशातून असंख्य आंबेडकरी समाज विजयस्तंभस्थळी एकवटला होता. कडाक्याची थंडीची तमा न बाळगता रात्रीपासून भीमसैनिकांनी गर्दी केली होती. नागरिकांना मानवंदना देण्यासाठी रांगेत सोडण्यात येत होते.
यावेळी १५ लाख भीमसैनिक अभिवादनासाठी या ठिकाणी आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. विजयस्तंभावरील कार्यक्रम नियोजन करण्यासाठी कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ समन्वय समितीचे राहुल डंबाळे, माजी महापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सचितानंद कडलक, विशाल सोनवणे, प्रवीण म्हस्के, दिपंकर इंगोले, निलेश गायकवाड, रोहन वाघमारे यांनी केले. समता सैनिक दलाने गर्दीचे नियोजन केले होते.
निवृत्त जवानांनी दिलेली मानवंदना विशेष आकर्षण
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९२७ साली विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी महार रेजीमेंटची स्थापना करण्याची मागणी स्तंभावरुनच केली होती. या घटनेची कृतज्ञता म्हणून दरवर्षी १ जानेवारीला विजयस्तंभास महार रेजीमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने मानवंदना देण्यात येत असते. यावर्षी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत महार रेजीमेंटच्या निवृत्त जवानांच्या वतीने दिलेली मानवंदना विशेष आकर्षण ठरले.





