लोणावळा : नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. त्यामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा, खंडाळा आदी ठिकाणी महत्वाच्या चौकात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, पुणे, ठाणे परिसरातील पर्यटकांनी मंगळवारी सकाळपासूनच शहरात गर्दी केली. पर्यटकांनी खासगी वाहनांनी पर्यटनस्थळी येण्यास प्राधान्य दिल्याने वाहनांची संख्या वाढून कोंडीत अधिक भर पडली. लोणावळ्यातील गवळी वाडा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. तसेच खंडाळा गाव ते पोलीस प्रशिक्षण केंद्र दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. लोणावळा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटकांनी यंदा लोणावळा, खंडाळा, पवना परिसरातील बंगले, फार्म हाऊस आरक्षित केले होते. त्यामुळे सायंकाळी निवांत इच्छित स्थळी जाण्याचे नियोजन पर्यटकांकडून करण्यात आले. मात्र वाहतूक कोंडीत अधिक वेळ गेल्याने पर्यटक काही प्रमाणात निराशही झाले. स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटकांचे स्वागत, तसेच मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.