विश्वकरंडकाच्या मिरवणुकीस चाहत्यांची गर्दी; पुणेकरांनी जवळून घेतला अभूतपूर्व अनुभव

पुणे – क्रिकेट विश्वकरंडकाची अभूतपूर्व मिरवणूक व करंडक जवळून पाहत त्याचा फोटो काढण्याचा आनंद क्रिकेट रसिकांनी घेतला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष रोहित पवार यांनी विश्वचषकाचे अनावरण करून मिरवणुकीची सुरुवात केली.
“आम्ही पदाधिकारी केवळ आमच्यापुरताविश्वकरंडकाचा फोटो काढू शकलो असतो. परंतु हा करंडक चाहत्यांचा आहे, महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. त्यामुळे तो बघण्याची संधी सर्वांना मिळावी, असे “एमसीए’चे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जे. डब्लू. मेरीएट हॉटेलपासून सेनापती बापट रस्ता, बीएमसीसी रस्ता, फर्गसन कॉलेज रस्ता ते कृषी महाविद्यालय अशी ही मिरवणूक झाली. याला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी विविध ढोल ताशा पथकांनी वादन केले, दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला. फर्गसन कॉलेजजवळ मुसळधार पावसात देखील ढोल ताशा पथक व चाहते यांनी त्यांचे क्रिकेटवरचे प्रेम दाखवून दिले. यावेळी विश्वचषक खेळलेले केदार जाधव, माजी कर्णधार चंदू बोर्डे आदी आजी व माजी खेळाडू रॅलीत सहभागी होते.




