Pune gramin | कपर्दिकेश्वर दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी..

प्रभात वृत्तसेवा
ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावरती कोरड्या तांदळापासून बनवलेल्या आणि एका लिंबावरती उभ्या असणार्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन भाविकांनी मनोभावे घेतले. पहाटेपासूनच भक्तांची मंदिर परिसरात रांग लागली होती. जय शिवशंभोच्या जयघोषात मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता.पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
मंदिरात पहाटे 6 वाजता श्री व सौ विलास पानसरे यांच्या हस्ते शिवलिंगाचे पूजन व आरती झाली. यावेळी सागर दाते, सचिन तांबे, अमोल डुंबरे, श्रेयस डुंबरे, पांडुरंग ताजणे, प्रसाद डुंबरे, सागर घोडेकर, पुजारी गोविंद डुंबरे, सागर घोडेकर उपस्थित होते. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यावेळी मंदिरामध्ये सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री कपर्दिकेश्वर देवधर्म ट्रस्ट व शिवनेरीचे शिलेदार समुह यांच्या वतीने श्रावण सरी भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन जय बालाजी उद्योग समूहाचे जयवंत डुंबरे यांच्या हस्ते झाले. कपर्दिकेश्वर देवधर्म ट्रस्टचे अध्यक्ष अनिल तांबे, विघ्नहरचे साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे, श्रीधर भालेराव, पांडुरंग ढोबळे, प्रकाश तांबे व सर्व संचालक उपस्थित होते. कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक श्रीहरी मेदनकर व त्यांच्या ग्रुपने सुमधुर भक्तीगीते, भावगीते सादर केली. ओतूर येथील सर्व प्राथमिक शाळा व विद्यालयांचा शालेय दिंड्या महोत्सव साजरा झाला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंड्या मंदिराकडे दर्शनासाठी आल्या.
त्यांचे स्वागत धर्मसंस्थेच्या वतीने करण्यात आले. त्याचबरोबर या लहान वारकर्यांना प्रसाद म्हणून पांडुरंग ताजणे यांच्या वतीने केळी व अनिल ढमाले आणि मित्रपरिवारांनी 100 किलो खिचडीचे वाटप लहान वारकर्यांना व भाविकांना करण्यात आले. महोत्सवातील लहान वारकर्यांना रत्ना शिरसाट व अनिल डुंबरे, काशिद यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.





