वाघोलीतील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर

वाघोली (प्रतिनिधी) :- वाघोली मधील विविध समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसमवेत पुणे महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाघोली मधील सर्व समस्या तातडीने सोडवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली तर यापूर्वी आमदार अशोक पवार यांनी केलेल्या विकास कामांसाठीच्या पाठपुराव्याला यश आले असून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी दिली.
आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत वाघोली गावातील ड्रेनेज लाईनचे अपुर्ण काम, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, नगर रोड व काही अंतर्गत रोड वरील अतिक्रमण, बकोरी व फुलमळा रोड, नगर पुणे रोड वरील ट्रॅफिक जॅम, अद्ययावत रूग्णालयाची नितांत आवश्यकता, पीएमपीएमएल (PMPML) च्या बसेसच्या फेऱ्या वाढविणे तसेच नवीन रूट सुरू करणे, नवीन घरांच्या टॅक्स नोंदणी आणि इतर अनेक विषयांवर चर्चा झाली.
सदरील बैठकीस वाघोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ दाभाडे,माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच जयश्री सातव, सुनील जाधवराव, किसन जाधवराव, ज्योती पाचर्णे,बाळासाहेब शिंदे, संजीव कुमार पाटील,नितीन जैन, प्रसाद केळकर,संदीप थोरात, योगेश सुर्यवंशी, गुरुमितसिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
….या कामांना मिळाली मंजुरी
१) काळुबाई नगर ते आव्हाळवाडी रोड, बकोरी फाटा ते म्हसोबा मंदिर, म्हसोबा मंदिर ते केसनंद रोड, केसनंद रोड ते आव्हाळवाडी रोड, बायफ रोड ते दादा सातव घर या परिसरातील सांडपाण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात होणार आहे.
२) पूर्व रंग सोसायटी ते कापुरी विहीर, सार्थक ते सांडवा लाईन साठी दहा कोटी निधी मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया राबवल्या नंतर कामाला सुरुवात होणार आहे.
“शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या पाठपुराव्याने वाघोली मधील सांडपाण्याच्या कामासाठी जवळपास वीस कोटी रुपये, हॉस्पिटल बांधकामासाठी पाच कोटी रुपये निधी, तर 23 गावांचा सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जवळपास 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद पुणे महानगरपालिकेने केली आहे.”
– रामभाऊ दाभाडे (नेते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
३) वाघोली येथे महानगरपालिकेच्या वतीने हॉस्पिटल बांधकामासाठी पाच कोटीची निधीची तरतूद करण्यात आली आहे.
४) महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा सांडपाण्याचा डी पी आर तयार करून एसटीपी प्लॅन व ड्रेनेज लाईन कामासाठी महानगरपालिकेने 200 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.





