वाघोली, (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने 17 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन विधानसभेसाठी इच्छुक असणार्या उमेदवारांच्या हस्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले. वाघोलीत बॅनरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली. विकास कामांच्या उद्घाटनांची एकाच दिवसात 24 तासांच्या आत हॅट्ट्रिक पूर्ण झाली आहे. या उद्घाटनांची वाघोलीत मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. विधानसभेसाठी इच्छुक असणारे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दि. 11 रोजी 11च्या सुमारास रात्री वाघोलीमध्ये जवळपास 17 कोटी रुपयांचे विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते युवराज दळवी, संजय सातव पाटील, राजेंद्र पायगुडे, सोसायटीमधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या उद्घाटनासाठी रात्रीच्या बारा नंतरच्या कालावधी देखील संपन्न झाला होता. दि. 12 रोजी सकाळी नऊच्या सुमारास पुणे महानगरपालिकेचे याच विकास कामांचे उद्घाटन विधानसभेसाठी इच्छुक असणारे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी माजी उपसरपंच मंदाकिनी जाधवराव, माजी सरपंच वसंतकाका जाधवराव, माजी उपसरपंच समीर भाडळे, अनिल सातव पाटील, मारुती गाडे, सुनील जाधवराव, संग्राम जाधवराव, विकास शिंदे, सचिन काळे, प्रशांत काळे, पिंटू कटके, मुकेश सातव व अन्य मान्यवर उपस्थित होते. तर सायंकाळी शिरूर हवेली विधानसभेच्या उमेदवारीच्या अंतिम रिंगणात इच्छुक असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिप भोंडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शासन नियुक्त विकास समिती सदस्य संदीप सातव, शांताराम कटके, संतोष देशमुख, श्याम गावडे, रवी काळे, बाळासाहेब सातव, अर्चना कटके, सोमनाथ आव्हाळे, महेंद्र भाडळे, जयप्रकाश सातव, कैलास सातव विजय जाचक, प्रदीप सातव, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. श्रेयवादाची लढाई शिगेला विकास कामांच्या उद्घाटनांची हॅट्ट्रिक पहिल्यांदा वाघोलीकरांना पाहायला मिळाली. वाघोलीत उद्घाटनांमुळे सध्या श्रेयवादाची लढाई अंतिम शिगेला पोहचली असल्याचे दिसून आले. विकास कामांसाठी पाठपुरावा केलेली पत्रे, दिलेल्या भेटी, अधिकार्यांसमवेत काढलेले फोटो, पाठपुराव्यानंतर विकास कामांचे आलेले टेंडर चे फोटो, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत खरी रंगत आली असल्याचे या तिन्ही उद्घाटनांच्यामुळे स्पष्ट झाले आहे. एकाच दिवसात रात्री आमदार अशोक पवार सकाळी माऊली कटके, सायंकाळी नागरिकांच्या गर्दीत प्रदीप कंद यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. एकाच विकास कामांच्या तीन उद्घाटने पाहण्याचा दुर्मिळ योग वाघोलीकरांना आला आहे हे मात्र सत्य स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर… भाजपचे संदीप सातव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनी मंत्रिमंडळाचे फोटो टाकून दि. 12 रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित 17 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर माजी उपसरपंच समीर भाडळे, अनिल सातव पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुक असणार्या माऊली कटके यांचा फोटो टाकून उद्घाटन दि. 12 रोजी सकाळी नऊच्या सुमारास होणार जाहीर केले. त्यानंतर आमदार अशोक पवार यांच्या निकटवर्तीय यांनी दि. 11 रोजी रात्री नऊच्या पुढे विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करून उद्घाटनच केले. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.