रब्बीतही पीक कर्ज वाटपास बँकांचा हात आखडता; शेतकरी येरझारा घालून त्रस्त

हिंगोली – मराठवाड्यात खरीप हंगामाच्यापाठोपाठ रब्बी हंगामातही बँकांनीपीक कर्ज वाटपास टाळाटाळ चालवल्याचे चित्र आहे. रब्बीमध्ये ४९१६ कोटी रुपयांपैकी २० नोव्हेंबरपर्यंत केवळ ५० हजार शेतकऱ्यांना ५०३ कोटी म्हणजेच १०.२४ टक्के कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिकअडचण कायम आहे.
मराठवाड्यात यावर्षी खरीप व रब्बी हंगामात मिळून १६,६९५ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, हळदया प्रमुख पिकांसाठी कर्ज वाटप केले जाते. यावर्षी मराठवाड्यात खरीपहंगामात ११,७७८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकीकेवळ ७२ टक्के पर्यंतच पीक कर्जवाटप झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँकेने कर्जवाटप बऱ्यापैकी केले. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जवाटपात हात आखडता घेतला होता. खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन, कापूस याप्रमुख पिकांतून लागवडीचा खर्चही निघाला नाही.
त्यामुळे रब्बी हंगामात पेरणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून बँकेत कर्जमागणीचे प्रस्ताव सादर केले जाऊ लागले आहेत.
मराठवाड्यात आतापर्यंत रब्बी हंगामात २० नोव्हेंबरपर्यंत ४९१६ कोटी रुपयांच्यापीक कर्ज वाटप उद्दिष्टापैकी केवळ ५०३ कोटी रुपयांचेच पीक कर्ज वाटप झाले. आतापर्यंत मराठवाड्यातील सर्वबँकांतून ५० हजार शेतकऱ्यांनाच पीककर्जाचा लाभ मिळाला.
विशेष म्हणजे रब्बी हंगामात पीक कर्ज वाटप करताना जिल्हा बँकांनी हात आखडता घेतला.धाराशिव, बीड, लातूर, जालना, नांदेडया ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडून शून्यटक्के कर्ज वाटप झाले आहे.
जिल्हानिहाय कर्ज वाटप
छत्रपती संभाजीनगरः ८११ कोटी पैकी ११,४७३ शेतकऱ्यांना १०१ कोटी रुपये
जालना ः ५०१ कोटींपैकी ५४७४ शेतकऱ्यांना ६९.५९कोटी
परभणी ः ७४४ कोटींपैकी ५९८९ शेतकऱ्यांना ६२.३४कोटी
हिंगोली ः ५१० कोटींपैकी ६१६७ शेतकऱ्यांना ६२.३१कोटी
लातूर ः ४८९ कोटी पैकी १८८९ शेतकऱ्यांना २०.९५कोटी
धाराशिव ः ५६२ कोटींपैकी ४५९३ शेतकऱ्यांना ५६.९१कोटी
बीड ः ६६० कोटींपैकी ७३६४ शेतकऱ्यांना ७०.९७कोटी
नांदेड ः ६३७ कोटींपैकी ७३७४ शेतकऱ्यांना ६७.२०कोटी





