पुणे जिल्हा | कडूस सोसायटीकडून 700 खातेदारांना पीक कर्ज

कडूस, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अग्रगण्य असणार्या कडूस विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या 700 खातेदार शेतकर्यांना पावणेपाच कोटीं रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. पीक कर्जाची रक्कम घेण्यासाठी शेतकर्यांनी सकाळपासून गर्दी केली होती.
यावर्षी खरीप हंगामासाठी प्रामुख्याने टोमॅटो, कांदा, ऊस, बटाटा या पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकर्यांच्या हितासाठीर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे अध्यक्ष अशोक गारगोटे व सचिव दादासाहेब कल्हाटकर यांनी सांगितले. पीक कर्ज वाटप विकास अधिकारी मुरलीधर ढोरे, व्यवस्थापक कांचन बोंबले, अध्यक्ष अशोक गारगोटे, कॅशियर राळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी अध्यक्ष पंडित मोढवे, सुदाम ढमाले, संचालक अतुल गारगोटे ,अतुल गारगोटे, राहुल गारगोटे, ज्ञानेश्वर ढमाले, रोहिणी काळोखे, पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष दिलीप ढमाले, साईनाथ गारगोटे, पोलीस पाटील नवनाथ काळोखे, बाळासाहेब पांगारे, गोरक्षनाथ मुसळे, लक्ष्मण मुसळे, रामदास जाधव, राजाराम घोडेकर आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जाची परतफेड शेतकरी मार्च महिन्यामध्ये करत असतो. यावर्षी सध्या असणारी दुष्काळ सदृश परिस्थिती पाहता शेतकर्यांना हे पैसे बँकेत जमा करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, शेतकर्यांना परतफेड करण्यासाठी सोसायटीने प्रयत्न करून लवकरात लवकर वाटप करण्याचा प्रयत्न केला.
यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असल्याची अध्यक्ष अशोक गारगोटे यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून मिळणार्या सोई आणि 15 टक्के लाभांश मिळाल्याने शेतकरी समाधानी असल्याचे सचिव दादासाहेब कल्हाटकर यांनी सांगितले.





