Crop Damage : बळीराजा संकटात! भवानीनगर परिसरात पावसामुळे ऊस भुईसपाट; वजनात मोठ्या घटीची भीती
Crop Damage : शनिवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर आणि बारामती तालुक्यात हक्काच्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान; शेतकरी चिंतेत.

Crop Damage – शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे इंदापूर व बारामती तालुक्यांतील शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजीपाला व फळबागांमधून वारंवार मिळणाऱ्या तोट्यामुळे शेतकरी हक्काचे आणि खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाकडे पाहतो; मात्र या वादळाने अनेक भागांतील ऊस पूर्णपणे जमिनीवर लोळवला आहे.
परिणामी, उसाच्या टनेजमध्ये (वजनात) मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात ऊस भुईसपाट झाल्यामुळे उसाची मुळे थेट जमिनीच्या वर आली आहेत. मुळ्या उघड्या पडल्याने पिकाला पुरेसे अन्नद्रव्य आणि पाणी मिळणार नाही, ज्यामुळे ऊस वाळू लागतो. त्यातच, ऊस जमिनीवर पडल्याने उंदरांचा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
उंदीर उसाचे कांडे खालून कुरतडतात, ज्यामुळे पुढील अन्नपुरवठा खंडित होऊन उभा ऊस वाळून जातो. अशा दुहेरी संकटामुळे कारखान्याला गाळपासाठी ऊस जाईपर्यंत त्याचे वजन कमालीचे घटणार आहे. उसाचे पीक जोमदार आणण्यासाठी लागवडीपासून ते गाळपापर्यंत शेतकरी रासायनिक खते आणि औषधांवर मोठा खर्च करतो.
अनेकदा पदरी पैसे नसताना केवळ उसाच्या बिलावर विसंबून बँकांकडून किंवा उसनवारीने खते आणली जातात. कारखाना बिल देईल तेव्हा ही देणी चुकती करायची, असे शेतकऱ्यांचे गणित असते; मात्र अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे. या दुष्टचक्रातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कधी सक्षम होणार, ही चिंता आता बळीराजाला सतावत आहे.
फळबागांनंतर आता हक्काचे पीकही धोक्यात
यंदाच्या कडक उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून, पाण्याची व्यवस्था करत उसाची पिके जगवली होती; मात्र निसर्गाच्या एकाच तडाख्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. संकटांची मालिका दरवर्षीच पाठीशी असल्याने ‘शेतकऱ्याला चांगले दिवस कधी येणार?’ हा प्रश्न कायम आहे.





