मुंबई – पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचे पथक रविवारी सकाळी सात वाजता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींदरम्यान आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार शिरसाट यांनी म्हटले की, “राऊत यांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट पडली. राऊत हे प्रवक्ता होते, मास लीडर नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईने मोठा क्षोभ उसळून येणार नाही. ईडीची कारवाई कायद्यानुसार होत आहे. राऊत निर्दोष असतील तर त्यांची सुटका होईल”, असे शिरसाट यांनी म्हटले.
“ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. “राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत:ची सुटका करून घ्यावी”, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले.
“संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊ नये. बाळासाहेबांची शपथ घेण्याचा अधिकार आम्हाला असून आम्ही पक्षासाठी 40 वर्ष काम केले आहे. नोकरी करता-करता नेते होणे सोपं नाही याची जाणीव आता राऊतांना होईल”, असा टोलाही त्यांनी लगावला.
राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले…
एक दिवस उद्धव ठाकरे हेच संजय राऊत यांना पक्षातून बाहेर काढतील असे शिरसाट यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका मांडत असताना काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत का असावं याबाबत सातत्याने सांगायचे. त्याचाच हा परिणाम असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.