आमदार संजय शिरसाट यांची खोचक टीका; म्हणाले,”राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतल्यासारखे…”

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त आक्रमक झाल्याचे दिसून आले. याच मुद्ययावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतलं आहे”, अशी खोचक टीका शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट यांनी ही टीका केली.
यावेळी शिरसाट यांनी, ”दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना याविरोधात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते. ठाकरे गटाचे आमदार सुद्धा शांत होते. म्हणजे, राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतल्यासारखे ते भांडत होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. पायऱ्यावर झालेल्या आंदोलनातही राष्ट्रवादी पुढं असल्याचे दिसून येते, अशी खोचक टीकादेखील यावेळी त्यांनी केली.
तुमची प्रतिक्रिया? व्यक्त व्हा कमेंट्स बॉक्समध्ये…#SanjayShirsat #ShivSena #NCP #uddhavThackeray pic.twitter.com/EMBPFq8tbh
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) December 24, 2022
दरम्यान, नागपूर NIT घोटाळ्याचे कागदपत्रं तपास यंत्रणांच्या हाती लागली असून हे प्रकरण दाबण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत, राऊतांच्या या आरोपावरही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. “संजय राऊत यांनी परवाचा उच्च न्यायालयाचा निकाल वाचलेला नाही. त्यांनी थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. जो घोटाळा झालाच नाही, तो दाबण्यासाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. तपास यंत्रणा त्यांच्या प्रमाणे काम करत असते. तपास यंत्रणा कोणालाही सोडत नाही. प्रकरण दाबण्यासारख्या छोट्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची आश्यकता नाही”, असे ते म्हणाले.
“महाविकास आघाडीचे नेते सभागृहात येऊन ‘५० खोके एकदम ओके’ म्हणतात. मात्र, आता जनताही या घोषणांना कंटाळली आहे. सत्तेत असताना स्वत:चे पाप लपवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीला लगावला. खोके सरकार म्हणणाऱ्यांकडे दुसरे विषय नाही. मुंबई महापालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत दिवाकर रावते, अनिल परब, सुभाष देसाई, संजय राऊत यांनी बोलावं”, असे आव्हान देखील यावेळी त्यांनी दिले.





