UEFA Nations League 2024-2025 : स्पेनचा डेन्मार्कवर विजय, रोनाल्डोचे कारकिर्दीतील 906 गोलही पूर्ण….

UEFA Nations League 2024-2025 :- ख्रिस्तीयानो रोनाल्डोने शनिवारी उशिरा झालेल्या सामन्यात विक्रमी 133 वा आंतरराष्ट्रीय गोल केल्याने पोर्तुगालने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पोलंडचा 3-1 असा पराभव केला, तर अन्य सामन्यात स्पेनने डेन्मार्कला 1-0 असे पराजित केले. रोनाल्डोच्या कारकिर्दीतील हा 906वा गोल होता.
राफेल लिओचा शॉट पोस्टवर आदळल्यानंतर 37व्या मिनिटाला रोनाल्डोने रिबाऊंडवर गोल केला. तत्पूर्वी, 26व्या मिनिटाला बर्नार्डो सिल्वाने पोर्तुगालसाठी पहिला गोल केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये रोनाल्डोला पोर्तुगालसाठी पाच सामन्यांमध्ये एकही गोल करता आला नव्हता, परंतु नेशन्स लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या तीनही सामन्यांमध्ये तो गोल करण्यात यशस्वी ठरला आहे.
🚨 CRISTIANO RONALDO HAS NOW SCORED 906 CAREER GOALS. pic.twitter.com/swrBFM1p9Z
— TCR. (@TeamCRonaldo) October 12, 2024
यामध्ये क्रोएशियाविरुद्ध केलेल्या गोलचाही समावेश आहे जो त्याच्या कारकिर्दीतील 900 वा गोल होता. पोलंडचा एकमेव गोल मिडफिल्डर पिओटर झीलिन्स्की याने 78 व्या मिनिटाला केला, परंतु बचावपटू जॅन बेडनारेकने खेळ संपण्यापूर्वी दोन मिनिटे अगोदर स्वत:चा गोल करून पोर्तुगालचा मोठा विजय निश्चित केला.
अ गटात पोर्तुगाल तीन सामन्यांत नऊ गुणांसह अव्वल आहे. क्रोएशियाचे सहा गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहे. झाग्रेब येथे झालेल्या सामन्यात त्यांनी स्कॉटलंडचा 2-1 असा पराभव केला. नेशन्स लीगच्या आणखी एका सामन्यात मार्टिन झुबिमेंडीने ७९व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर स्पेनने डेन्मार्कचा 1-0 असा पराभव केला.
या विजयासह गतविजेत्या स्पेनचे अ गटात तीन सामन्यांनंतर सात गुण झाले आहेत. डेन्मार्क सहा गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सर्बियाचे चार गुण आहेत. त्यांनी दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा 2-0 असा पराभव केला. तर क गटात कोसोवोने लिथुआनियाचा 2-1 असा पराभव केला, तर रोमानियाने सायप्रसचा 3-0 असा पराभव केला.





