Ronaldo Jota Tribute : पोर्तुगालच्या विजयानंतर रोनाल्डोला अश्रू अनावर! २१ नंबरची जर्सी घालत ‘या’ दिवंगत खेळाडूला वाहिली भावनिक श्रद्धांजली
Ronaldo Jota Tribute : रोनाल्डोने त्याचा दिवंगत सहकारी डिओगो जोटा याची २१ नंबरची जर्सी परिधान केली आणि भावुक होत आकाशाकडे बोट दाखवत हा ऐतिहासिक विजय त्याला समर्पित केला.

Portugal vs Croatia Cristiano Ronaldo Diogo Jota Tribute : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत ‘राउंड ऑफ ३२’ च्या ऐतिहासिक सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा २-१ असा पराभव करत बाद फेरीत धडक मारली आहे. मात्र, या विजयानंतर मैदानावर आनंदाऐवजी कमालीचे भावनिक वातावरण पाहायला मिळाले. सामना संपताच स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि संपूर्ण संघ भावुक झाला. रोनाल्डोने त्याचा दिवंगत सहकारी डिओगो जोटा याची २१ नंबरची जर्सी परिधान केली आणि भावुक होत आकाशाकडे बोट दाखवत हा ऐतिहासिक विजय त्याला समर्पित केला.
डिओगो जोटाच्या आठवणीत संपूर्ण संघ भावुक –
या भावनिकतेमागचे कारण म्हणजे, डिओगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचे वर्षभरापूर्वी एका भीषण कार अपघातात निधन झाले होते. या दुःखद घटनेला येत्या शुक्रवारी बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. जोटाने पोर्तुगालसाठी ४९ सामने खेळताना १४ गोल केले होते. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर संपूर्ण संघाने मैदानाच्या मध्यभागी उभे राहून जोटाचे स्मरण केले. सामन्यानंतर रोनाल्डो म्हणाला, “जोटा आज आमच्यात नसला तरी तो आमच्यासोबतच आहे. त्याला आदरांजली वाहण्यासाठी आज जिंकणे हाच आमच्याकडे एकमेव पर्याय होता.”
Cristiano Ronaldo got emotional as he put on a Portugal jersey with Diogo Jota’s No. 21 after their win ❤️ pic.twitter.com/LeVmWmmkmB
— B/R Football (@brfootball) July 3, 2026
४१ व्या वर्षी गोल करत रोनाल्डोचा जागतिक विक्रम –
Diogo Jota sempre connosco 🫂❤️ pic.twitter.com/we4haDKCBb
— ana⸆⸉ ❤️🔥 (@invisibleasu) July 3, 2026
सामन्यात सुरुवातीला क्रोएशियाच्या इव्हान पेरिसिकने गोल केल्यामुळे पोर्तुगाल १-० ने मागे पडला होता. परंतु, ६८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर ख्रिस्तियानो रोनाल्डोने शानदार गोल केला. रोनाल्डोच्या कारकिर्दीतील फिफा विश्वचषक नॉकआऊट स्टेजमधील हा पहिलाच गोल ठरला. या गोलसह वयाच्या ४१ व्या वर्षी पुरुष विश्वचषक नॉकआऊट सामन्यात गोल करणारा तो फुटबॉल इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यानंतर, इंजरी टाईममध्ये गोन्सालो रामोसने पोर्तुगालसाठी विजयी गोल केला.
शेवटच्या सेकंदाला ‘VAR’ चा ड्रामा; आता स्पेनशी टक्कर –
Las lágrimas de Cristiano Ronaldo cuando se pone la camiseta de Diogo Jota 💔 pic.twitter.com/A8lRte3HKr
— (fan) REAL MADRID FANS 🤍 (@AdriRM33) July 3, 2026
सामन्याचा शेवट प्रचंड नाट्यमय आणि वादाने झाला. अगदी शेवटच्या सेकंदात क्रोएशियाच्या मारियो पसालिकने गोल करून स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला होता. मात्र, व्हिडिओ असिस्टंट रेफ्री (VAR) रिव्ह्यूनंतर पसालिकला ऑफसाईड घोषित करण्यात आल्याने क्रोएशियाचा गोल रद्द झाला आणि पोर्तुगालने २-१ ने बाजी मारली. आता ‘राउंड ऑफ १६’ मध्ये सोमवारी पोर्तुगालचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी स्पेनशी होईल.





