Mbappe Historic Goals : मेस्सीचा मुकुट धोक्यात! फिफा विश्वचषकात २ गोल करत किलियन एम्बाप्पेने रचला इतिहास; स्वीडनला नमवून फ्रान्सची आगेकूच
Mbappe Historic Goals : एम्बाप्पेने पुन्हा एकदा आपल्या जादुई खेळाचे प्रदर्शन करत दोन शानदार गोल डागले, तर ब्रॅडली बारकोला याने एक गोल करत त्याला उत्तम साथ दिली.

Mbappe Historic Goals France vs Sweden FIFA World Cup 2026 Round of 32 Result : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ स्पर्धेत फ्रान्सने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत दिमाखात ‘राउंड ऑफ १६’ मध्ये प्रवेश केला आहे. ‘राउंड ऑफ ३२’ च्या एकतर्फी झालेल्या सामन्यात फ्रान्सने स्वीडनचा ३-० असा धुव्वा उडवला. फ्रान्सच्या या ऐतिहासिक विजयाचा महानायक ठरला तो त्यांचा स्टार कर्णधार किलियन एम्बाप्पे. एम्बाप्पेने पुन्हा एकदा आपल्या जादुई खेळाचे प्रदर्शन करत दोन शानदार गोल डागले, तर ब्रॅडली बारकोला याने एक गोल करत त्याला उत्तम साथ दिली. या विजयासोबतच फ्रान्सने विश्वचषक इतिहासात सलग ५ सामन्यांत किमान ३ गोल करणारा जगातील पहिला संघ बनण्याचा सुवर्ण पराक्रम केला आहे.
एम्बाप्पेने मिरोस्लाव क्लोझला टाकले मागे; आता केवळ मेस्सी पुढे –
स्वीडनविरुद्ध दोन गोल करताच किलियन एम्बाप्पेच्या फिफा विश्वचषकातील एकूण गोल्सची संख्या आता १८ झाली आहे. यासह त्याने जर्मनीच्या महान मिरोस्लाव क्लोझला (१६ गोल) मागे टाकून विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. आता त्याच्यापुढे केवळ अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी आहे, ज्याच्या नावावर १९ गोल आहेत.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये स्वीडनच्या मजबूत बचावफळीने फ्रान्सला चांगलेच झुंजवले. मात्र, ४३ व्या मिनिटाला एम्बाप्पेने अप्रतिम फुटवर्क दाखवत पेनल्टी बॉक्समधून गोल करत फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या हाफमध्ये ओलिसची जादू अन् डेशॅम्प्सची प्रतिक्रिया
Triple threat 🤝
France have become the first team in @FIFAWorldCup history to score three or more goals in five consecutive matches 🇫🇷 pic.twitter.com/aI4tF2swg9
— FIFA (@FIFAcom) July 1, 2026
दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सने सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. मायकेल ओलिसने दिलेल्या पासवर ब्रॅडली बारकोलाने फ्रान्सचा दुसरा गोल केला. यानंतर काहीच वेळात ओलिसच्या आणखी एका पासचा फायदा उठवत कर्णधार एम्बाप्पेने आपला दुसरा आणि विश्वचषक बाद फेरीतील एकूण १० वा गोल पूर्ण केला.
सामन्यानंतर फ्रान्स संघाचे मॅनेजर डिडिएर डेशॅम्प्स (Didier Deschamps) म्हणाले, “आम्हाला संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे. बाद फेरीत कोणताही सामना सोपा नसतो.” फ्रान्सने इतिहासामध्ये सातव्यांदा, तर सलग चौथ्यांदा ऑलिम्पिक/विश्वचषकाच्या अंतिम १६ मध्ये जागा मिळवली आहे. आता ५ जुलै रोजी फिलाडेल्फिया येथे त्यांचा सामना बलाढ्य पॅराग्वेविरुद्ध होणार आहे.





