रुपयावर संकट! 50 पैशांची घसरण; व्यापार युद्धामुळे चलन बाजारात अस्थिरता

मुंबई – अमेरिकेने चिनी आयातीवर १०४ टक्के आयात शुल्क लादण्याची धमकी दिल्याने व्यापार युद्ध थांबण्याची शक्यता धूसर झाली आहे. याचा परिणाम भारतातील परकीय चलन साठ्यावर होत असून, परदेशी गुंतवणूक बाहेर पडत आहे. मंगळवारी रुपयाचे मूल्य तब्बल ५० पैशांनी घसरून ८६.२६ रुपये प्रति डॉलरवर पोहोचले. गेल्या तीन महिन्यांत एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी १३ जानेवारीला रुपया ६६ पैशांनी कोसळला होता. व्यापार युद्धामुळे सोमवारी ३२ पैसे आणि शुक्रवारी १४ पैशांची घसरण झाली होती.
उद्या (बुधवार) रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. कोसळता रुपया आणि तीव्र व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्याजदर आणि भांडवल सुलभतेबाबत रिझर्व्ह बँक काय निर्णय घेते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. दरम्यान, मंगळवारी डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत वाढले. सहा प्रमुख चलनांशी तुलना करणारा डॉलर इंडेक्स ०.०६ टक्क्यांनी वाढून १०३.०३ अंकांवर पोहोचला, ज्याचा रुपयावरही परिणाम झाला.
डॉलरची मागणी वाढली, रुपया दबावात –
आयातदार कंपन्यांनी डॉलरची मागणी वाढवली, तर परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने डॉलरचा साठा घटला आहे. याचा थेट फटका रुपयाला बसला. एचडीएफसी सिक्युरिटीचे विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, “या आठवड्यात रुपयाचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत जास्त घसरले आहे. व्यापार युद्धाचा परिणाम सर्वच चलनांवर होत आहे, पण भारतावर त्याचा प्रभाव अधिक दिसतो.” या अस्थिरतेमुळे चलन बाजारात चिंतेचे वातावरण आहे.





