Talegaon MIDC Accident : तळेगावात भीषण अपघात! भरधाव बसने दुचाकीला चिरडले; २८ वर्षीय तरुणाचा जागीच अंत
Talegaon MIDC Accident : अपघातानंतर पळ काढणाऱ्या बस चालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ३३ वर्षीय सचिन हराळेवर गुन्हा दाखल, तपास सुरू.

Talegaon MIDC Accident – तळेगाव एमआयडीसी परिसरातील वराळे फाट्याजवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने एका २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. ही घटना शुक्रवारी (दि. १० एप्रिल) रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडली आहे.
सचिन दत्तात्रय हराळे (वय ३३, रा. येलवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या बस चालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अपघातात शेखर राजेंद्र बाविस्कर (वय २८, रा. वराळे फाटा) यांचा मृत्यू झाला आहे. मनोज अरुण ठाकरे (वय २५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी रात्री १२:१५ च्या सुमारास शेखर बाविस्कर हे आपल्या दुचाकीवरून (एमएच ४५ वाय ५६५८) नवलाख उंब्रे ते वराळे फाटा असे जात होते. महादेव मंदिराजवळ आले असता समोरून आलेल्या बसने (एमएच १४ सीडब्ल्यू ४१०८) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शेखर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.





