Crime News : शिरूरमधील गोळीबार प्रकरण : तिन्ही आरोपी ३६ तासांत जेरबंद; पोलिसांच्या कारवाईचे कौतुक
Crime News : १८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लाटेआळी, आंबेडकरनगर येथे ही घटना घडली.

शिरूर : शिरूर शहरातील लाटेआळी, आंबेडकरनगर परिसरात पत्ते खेळताना दोन लाख रुपये खिशातून काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हरिश दादाभाऊ गंगावणे (वय ३४) यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला. या घटनेने शिरूर शहर हादरले असतानाच, शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या ३६ तासांत खुनातील तिन्ही आरोपींना सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) येथून ताब्यात घेतले.
रोहित रवींद्र सोनवणे (वय २४, रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे (वय २३) आणि आदित्य दादाभाऊ पवार (वय १९, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध यापूर्वीही अवैध गावठी पिस्तूल बाळगणे, मारामारी आणि जबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
१८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लाटेआळी, आंबेडकरनगर येथे ही घटना घडली. पैसे चोरी गेल्याचा जाब विचारण्यावरून वाद झाल्यानंतर तो वाद मिटवण्यासाठी आलेल्या हरिश गंगावणे यांच्यावर पाठीमागून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पसार झाल्याने त्यांचा शोध घेणे शिरूर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सुपा टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुपा टोलनाका परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अंबादास थोरे, सचिन भोई, राहुल वाघमोडे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन केणेकर करीत आहेत.
खुनातील आरोपींना ३६ तासांत पकडल्याबद्दल शिरूर पोलिसांचे कौतुक होत असले, तरी या घटनेने शहरातील अवैध धंदे, जुगाराचे अड्डे, बेकायदा शस्त्रे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिरूर शहरात विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वेळोवेळी केल्या जात असताना त्यावर ठोस आणि सातत्यपूर्ण कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. जुगाराच्या अड्ड्यांमध्ये पैशांवरून होणारे वाद, त्यातून वाढणारी दहशत आणि बेकायदा शस्त्रांचा वापर यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
अवैध धंद्यांवर वेळीच कारवाई झाली असती तर अशा घटनांना आळा बसला असता का? शहरात बेकायदा शस्त्रे फिरत असतील तर त्यांची माहिती पोलिसांना का मिळत नाही? एखाद्याचा गोळीबारात जीव गेल्यानंतरच पोलिस यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये येणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.शिरूर शहरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांबाबत पोलिस प्रशासनाने केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडण्यापुरती कारवाई न करता गुन्ह्यांच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे. अवैध जुगार, बेकायदा शस्त्रांची वाहतूक व विक्री, अमली पदार्थ आणि इतर बेकायदा व्यवसायांवर सातत्याने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एका बाजूला पोलिसांनी खुनातील तिन्ही आरोपींना ३६ तासांत जेरबंद करून तपासातील तत्परता दाखवली आहे; मात्र दुसऱ्या बाजूला ‘गुन्हा घडल्यानंतर आरोपी पकडणे’ आणि ‘गुन्हा घडूच न देण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणे’ यात मोठा फरक आहे.
शिरूर शहराला आता केवळ गुन्हे उघडकीस आणणारी नव्हे, तर अवैध धंद्यांना आणि गुन्हेगारीला सुरुवातीलाच आळा घालणारी पोलिसिंग अपेक्षित आहे. अन्यथा, ‘अवैध धंद्यांचा बळी पुढचा कोण?’ हा प्रश्न पुन्हा पुन्हा नागरिकांसमोर उभा राहणार आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी शिरूर शहरातील अवैध धंद्यांविरोधात आता व्यापक आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.





