Pune News : राज्यात नऊ महिन्यांत ४४ टन अमली पदार्थ नष्ट; १,४१० कोटींचा मुद्देमाल निकाली
२०२५ या संपूर्ण वर्षात नष्ट केलेल्या अमली पदार्थांच्या वजनाच्या तुलनेत २०२६ मधील पहिल्या नऊ महिन्यांत हे प्रमाण सुमारे ७२ टक्क्यांनी अधिक आहे.

Pune News : महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधातील कारवायांबरोबरच जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करण्याची व्याप्तीही वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत राज्यात ४४ हजार ६१३ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
या मुद्देमालाची नोंदवलेली किंमत १ हजार ४१० कोटी ४ लाख रुपये आहे. विशेष म्हणजे, २०२५ या संपूर्ण वर्षात नष्ट केलेल्या अमली पदार्थांच्या वजनाच्या तुलनेत २०२६ मधील पहिल्या नऊ महिन्यांत हे प्रमाण सुमारे ७२ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यातील विविध पोलीस घटक आणि उच्चस्तरीय समितीमार्फत नष्ट करण्यात आलेल्या एनडीपीएस मुद्देमालाच्या वर्षनिहाय आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. २०२५ मध्ये २५ हजार ९८० किलोहून अधिक, तर २०२४ मध्ये ६ हजार ८६१ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. त्या तुलनेत २०२६ च्या सप्टेंबरअखेरची नोंद लक्षणीय आहे.
वजनात २०२६, तर किमतीत २०२३ आघाडीवर
नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या वजनाचा विचार करता २०२६ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक नोंद झाली आहे. मात्र, मुद्देमालाच्या किमतीच्या बाबतीत २०२३ हे वर्ष आघाडीवर आहे. त्या वर्षी १३ हजार १३३ किलोहून अधिक अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. त्यांची नोंदवलेली किंमत तब्बल ५ हजार ६९१ कोटी २३ लाख रुपये होती.
इतर वर्षांच्या आकडेवारीनुसार, २०२१ मध्ये १२० कोटी ५० लाख रुपये, २०२२ मध्ये ५५ कोटी २४ लाख रुपये, २०२४ मध्ये ६२ कोटी ६६ लाख रुपये, तर २०२५ मध्ये ५२३ कोटी १७ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. त्यामुळे नष्ट केलेल्या मुद्देमालाचे वजन आणि त्याची किंमत यांमध्ये वर्षनिहाय मोठी तफावत दिसून येते.
अमली पदार्थ बाळगण्याच्या गुन्ह्यांत दुपटीहून अधिक वाढ
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अशा प्रकारचे १ हजार ८१५ गुन्हे नोंदवण्यात आले होते. २०२५ मध्ये ही संख्या ३ हजार ६५९ वर पोहोचली. म्हणजेच चार वर्षांत अशा गुन्ह्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे.
अमली पदार्थ सेवनाशी संबंधित गुन्ह्यांमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२१ मध्ये ८ हजार ८५३ गुन्हे दाखल झाले होते. २०२५ मध्ये ही संख्या १३ हजार ९५४ पर्यंत पोहोचली.
२०२६ मध्ये सप्टेंबरअखेर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी २ हजार ९५७, तर सेवनाशी संबंधित ११ हजार ५३८ गुन्हे नोंदवण्यात आले. या नऊ महिन्यांत एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १३ हजार ३५५ आरोपींना अटक करण्यात आली. याच कालावधीत जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या मुद्देमालाची नोंदवलेली किंमत ६१९ कोटी ८३ लाख रुपये आहे.
२०२५ मध्ये १५,९९३ आरोपींना अटक
एनडीपीएस कायद्यांतर्गत झालेल्या अटकेच्या आकडेवारीवरूनही अमली पदार्थांविरोधातील कारवायांची व्याप्ती स्पष्ट होते. २०२५ मध्ये राज्यात एकूण १५ हजार ९९३ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्याआधी २०२४ मध्ये १४ हजार २३०, तर २०२३ मध्ये १६ हजार १०५ आरोपींना अटक झाल्याची नोंद आहे.
२०२६ मधील पहिल्या नऊ महिन्यांतच १३ हजार ३५५ आरोपींना अटक झाली आहे. त्यामुळे वर्षअखेरीपर्यंत ही संख्या किती होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, अमली पदार्थ जप्त करण्याच्या कारवायांसोबतच जप्त मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची विल्हेवाट लावण्यावरही पोलीस यंत्रणेचा भर असल्याचे आकडेवारीतून दिसून येते.





