Pune Firing: वारजे माळवाडी परिसरात शुक्रवारी रात्री ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यशदीप चौक ते चैतन्य चौक दरम्यान एका केशकर्तनालयात बसलेल्या निहाल शिंदे व अमोल आढाव यांच्यावर गोळीबारासह कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सुमारे रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित आरोपी हा उत्तमनगर पोलीस ठाण्यातील ड्रग्स प्रकरणातील फरार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.