Crime : पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री ST बस अडवून 9 हजारांची लूट; चालक-वाहकाला मारहाण
Crime : न्हावरे फाट्यावर मध्यरात्री काळ्या स्कॉर्पिओमधून आलेल्या चौघांनी एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण केली. 8,960 रुपयांची रोकड लुटून बसची तोडफोड केली.

Crime : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून चालक आणि वाहकाला मारहाण करत रोकड लुटल्याची धक्कादायक घटना न्हावरे फाटा परिसरात घडली. काळ्या रंगाच्या, क्रमांक नसलेल्या स्कॉर्पिओमधून आलेल्या चार अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
४ सप्टेंबर रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास चालक संदीप थोरवे हे पुण्याहून शिरूर आगाराकडे एसटी बस घेऊन जात होते. कानिफनाथ मंदिराजवळ न्हावरे फाट्यावर स्कॉर्पिओ बससमोर आडवी लावून आरोपींनी बस थांबवली. गाडीला धक्का का दिला, असा जाब विचारत त्यांनी चालकाला शिवीगाळ व मारहाण केली.
मदतीला आलेल्या वाहक सतीश बाचकर यांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर वाहकाच्या खिशातील ८ हजार ९६० रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. आरोपींनी बसच्या समोरील काचेवर दगड फेकून नुकसान केले आणि बसची चावी घेऊन फरार झाले.
याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.





