Mobile Theft : राजगुरुनगर बाजारपेठेत मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिस कारवाईवर नागरिकांचा रोष
Mobile Theft : शुक्रवार आणि रविवारचा बाजार आता चोरीसाठी कुप्रसिद्ध; पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांचा संताप अनावर.

Mobile Theft – शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार आणि रविवारचा भाजीपाला बाजार हे खरेदीपेक्षा मोबाईल चोरीसाठीच कुप्रसिद्ध होत चालले आहेत. गर्दीचा फायदा घेत चोरटे हातोहात महागडे मोबाईल, महिलांच्या पर्स आणि दागिने लंपास करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राजगुरुनगर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून मोठ्या लोकसंख्येचे केंद्र बनले आहे.
दर शुक्रवारी आठवडे बाजार आणि रविवारी भाजी बाजारासाठी हजारो नागरिक येथे येतात. नगर परिषद परिसर, जुना मोटार स्टॅण्ड, तहसील कार्यालय ते महात्मा गांधी विद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेत संघटित मोबाईल चोरट्यांचे रॅकेट सक्रिय झाले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अरुंद रस्ते आणि अव्यवस्थित बाजारपेठेमुळे नागरिकांचे लक्ष विचलित होत असताना चोरटे अत्यंत सफाईने मोबाईल लंपास करत आहेत. अनेकदा चोरी झाल्याचे लक्षात येईपर्यंत चोरटे फरार झालेले असतात. गेल्या काही वर्षांत शेकडो मोबाईल चोरीच्या घटना घडल्या असून अनेकांनी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, बहुतांश प्रकरणांमध्ये तपास पुढे सरकत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
पोलिस केवळ आश्वासने देतात, प्रत्यक्ष कारवाई होत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संघटित टोळी कार्यरत असल्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.
नागरिकांनी बाजार परिसरात नियमित व दृश्यमान पोलिस गस्त ठेवावी, साध्या वेशातील पोलिस तैनात करावेत, सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करावी आणि संशयित टोळ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.





