Loni Kalbhor Police : पोलिसांची ‘धडाकेबाज’ कामगिरी! हरवलेला व जप्त 18 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
Loni Kalbhor Police : तांत्रिक विश्लेषण आणि कसून तपासाला यश; १० तोळे सोने, चांदीचे दागिने आणि अडीच लाखांचे मोबाईल मूळ मालकांना सुपूर्त.

Loni Kalbhor Police – नागरिकांचा हरवलेला, गहाळ झालेला तसेच विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करून पोलिसांनी नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अनेकांच्या चेहर्यावर आनंद फुलला असून, हरवलेले दागिने व मोबाईल परत मिळाल्यानंतर काही नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.
या मुद्देमालामध्ये सुमारे 15 लाख रुपयांचे 10 तोळे सोने, 1 लाख रुपयांचे चांदीचे दागिने तसेच सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल फोन यांचा समावेश आहे. गुन्ह्यांचा कसून तपास, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. लोणी काळभोरच्या सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या हस्ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुद्देमाल वितरण कार्यक्रम पार पडला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मांजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, बापू वाघमोडे, योगेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आला.
वडकी येथील राहू खंडू मोडक यांना 9.360 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, तर कवडीपाट टोलनाका येथील किसन बबन इंगळे यांना 3 ग्रॅम सोने व चांदीच्या पट्ट्या परत देण्यात आल्या. तसेच कदमवाकवस्ती परिसरातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून तीन तोळे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले होते. हा संपूर्ण मुद्देमाल मूळ मालक शांती शंकर सोलंखी यांना परत करण्यात आला.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी अथवा गहाळ झालेले मोबाईल फोनही पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले. सुमारे एक लाख रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन एकनाथ सोपान मेमाणे, रत्नमाला नंदकुमार बोराटे, रमेश रामचंद्र जुगदळ, रेवती रमा गुप्ता, साजीद तांबोळी आणि दत्तात्रय ज्ञानोबा कोतवाल यांना परत करण्यात आले. फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2025 मधील मोठ्या घरफोडीचा छडा लावत पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी आरोपीला अटक केली होती.
या कारवाईत चोरीस गेलेले 5 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले होते. ते दागिने मूळ मालक अभिजित मधुकर पठारे (रा. होळकरवाडी, ता. हवेली) यांना परत देण्यात आले. तसेच हरवलेले चार मोबाईल फोन शोधून मुस्कान जाधव, शाम मिसाळ, अक्षय कारंडे आणि सुधीर खताळ यांनाही सुपूर्त करण्यात आले. गुन्हे उघडकीस आणत नागरिकांचा विश्वास जपणार्या लोणी काळभोर आणि फुरसुंगी पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.






