Dowry Harassment : धक्कादायक! इंदापुरात सासरच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Dowry Harassment : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथे विवाहित तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Dowry Harassment – इंदापूर तालुक्यातील वरकुटे बु. येथे एका १९ वर्षीय विवाहित तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी विकास शिंदे हिने सोमवारी (दि. २७) २. १५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर मृत तरुणीची आई दिपाली रामचंद्र जामदार (रा. बेलवाडी) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पती विकास अजिनाथ शिंदे, दीर प्रकाश अजिनाथ शिंदे व सासू सुरेखा अजिनाथ शिंदे (सर्व रा. वरकुटे बु.) यांनी तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मारहाण केली.
तसेच “माहेरहून दोन लाख रुपये आण” असा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या छळाला कंटाळूनच शिवानीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला असून, या तिघांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम १०८, ८५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिरादार करत आहेत.





