Abandoned Newborn Baby : मन सुन्न करणारी घटना! वेळ नदीकाठी नवजात बालक बेवारस सोडलं; धक्कादायक कारण समोर?
Abandoned Newborn Baby : पहाटेच्या सुमारास अनैतिक संबंधातून बालक सोडल्याचा पोलिसांना संशय; अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल, श्वान पथकाचीही मदत.

Abandoned Newborn Baby – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या कडेला एक नवजात पुरुष जातीचे बालक बेवारसपणे सोडून दिल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात पालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बालकाला पोलिसांच्या फुलांनी सजवलेल्या वाहनातून पुण्यातील भारतीय समाज सेवा संस्थेत दाखल केले.
शिक्रापूर येथील वेळ नदीच्या कडेला (दि.२३) मे रोजी सकाळी एक नवजात बालक बेवारसपणे सोडल्याची माहिती सचिन करंजे यांनी येथील सर्पमित्र व पत्रकार शेरखान शेख यांना दिली. शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. या बालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी डॉ. शहाजी कदम, डॉ. पराग कानडे, प्रिया जाधव- ढगे, वैभवी शेळके, आरोग्य सेविका कल्पना ढोकले आदींनी बालकावर उपचार केले.
शिक्रापूर पोलीस व नागरिकांनी परिसरात बेवारस बालकाच्या पालकांचा शोध घेतला. घटनास्थळी श्वान पथकाने धाव घेतली. मात्र बालकाच्या पालकांचा काहीही शोध लागला नाही. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवली. याबाबत सर्पमित्र व पत्रकार शेरखान सिकंदर शेख यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात पालकांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे व सुजित जगताप हे करीत आहे.
अनैतिक संबंधाचा किनार
वेळ नदीकाठी परिसरात हे बालक पहाटेच्या सुमारास सोडले आहे. पहाटेच्या वेळी संबंधित कुटुंबीयांनी हे कृत्य केले आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांत हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. तसेच अनैतिक संबंधातून या निरागस बालकाला निर्जनस्थळी सोडल्याचा संशय आहे. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.





