जांबूत : शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील युवकावर प्रेमविवाहाच्या रागातून तीन जणांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील २९ वर्षीय तरुणाला लोखंडी रॉडसह, काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ऋषिकेश बबन निचित यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी वडनेर खुर्द (ता. शिरूर) येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश निचित हे वडनेर खुर्द येथील शिवशंभो हॉटेल मध्ये बसलेले असताना गावातीलच ऋतिक राजेंद्र बोऱ्हाडे, विशाल चंद्रकांत गोफणे व सुशांत योगेश बोऱ्हाडे या तिघांनी ऋषिकेश निचित यांना मोटारसायकलवर बसवून गावातील गणपती माळ येथे घरी घेऊन गेले. यावेळी ऋतिक बोऱ्हाडे, विशाल गोफणे, सुशांत बोऱ्हाडे यांचेसह घटनास्थळावर उपस्थित असलेले त्यांचे दोन साथीदार चंद्रकांत गोफणे व योगेश बोऱ्हाडे यांनी ऋषिकेश निचितला लोखंडी रॉड, काठीने पाठीवर, हातावर तसेच दोन्हीही पायांवर मारहाण केल्याने दुखापत झाली आहे. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम १९१ (२), १८९ (२) , १९१ (३), ११८(१), ३५२ ,३५१ (२), ३५१ (३) प्रमाणे शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर करत आहेत.