Crime Patrol : ‘क्राइम पेट्रोल’मध्ये मोठा ट्विस्ट.! अनुप सोनींच्या जागी दिसणार बॉलिवूडचा ‘सिंघम’; अजय देवगणच्या एण्ट्रीवर जुन्या होस्टची पहिली प्रतिक्रिया…
अजय देवगण ‘क्राइम पेट्रोल’मध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वांचं लक्ष अनुप सोनींच्या प्रतिक्रियेकडे लागलं होतं.

Crime Patrol : टेलिव्हिजनवरील गुन्हेगारी विश्वातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या शोचं नाव घेतलं की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर एक चेहरा आणि एक आवाज उभा राहतो अनुप सोनी! ‘सावधान राहा, सतर्क राहा…’ म्हणत गंभीर आवाजात गुन्ह्यांच्या थरारक कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनुप सोनींचं ‘क्राइम पेट्रोल’सोबतचं नातं अक्षरशः घराघरात पोहोचलं. त्यामुळे आता या लोकप्रिय शोमध्ये मोठा बदल होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. कारण अनुप सोनींच्या जागी आता थेट बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजेच अभिनेता अजय देवगण दिसणार आहे.
होय, ‘क्राइम पेट्रोल’च्या आगामी नव्या सीझनचं सूत्रसंचालन अजय देवगण करणार आहे. विशेष म्हणजे, अजयचा हा टेलिव्हिजन होस्ट म्हणून महत्त्वाचा पदार्पणाचा टप्पा ठरणार आहे. शोच्या नव्या प्रोमोमध्ये अजयची झलक समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही या नव्या जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनुप सोनींच्या शांत, गंभीर आणि संयमी निवेदनाची सवय असलेल्या प्रेक्षकांसमोर अजय देवगणचा दमदार अंदाज कसा रंगणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
अजय देवगण ‘क्राइम पेट्रोल’मध्ये येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सर्वांचं लक्ष अनुप सोनींच्या प्रतिक्रियेकडे लागलं होतं. अखेर अनुप यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या बदलावर फारसं भाष्य न करता शोसोबतच्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला.
अनुप म्हणाले की, ‘क्राइम पेट्रोल’शी ते गेल्या अनेक वर्षांपासून जोडले गेले आहेत. या शोसोबत त्यांचं खास नातं असून, इतक्या वर्षांत प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमासाठी ते कायम आभारी आहेत. अजय देवगणचे आपण मोठे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, ‘गंगाजल’ आणि ‘अपहरण’ या चित्रपटांमध्ये अनुप आणि अजय यांनी एकत्र काम केलं आहे.
अजय देवगण या शोमध्ये स्वतःची एक वेगळी शैली घेऊन येईल, असा विश्वासही अनुप यांनी व्यक्त केला असून, नव्या सीझनसाठी त्यांनी टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. अनुप यांनी अजयच्या एण्ट्रीबद्दल सकारात्मक भूमिका घेतली असून, शोच्या पुढील पर्वासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अजय देवगणने शूट केले १५ एपिसोड्स!
दरम्यान, अजय देवगणने या नव्या पर्वासाठी तब्बल १५ एपिसोड्सचं शूटिंग पूर्ण केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे अजयची एण्ट्री केवळ प्रोमोपुरती मर्यादित नसून, तो प्रत्यक्ष शोमध्येही प्रेक्षकांना गुन्ह्यांच्या थरारक कथा सांगताना दिसणार आहे. ‘क्राइम पेट्रोल’चा हा नवा सीझन ३१ ऑगस्टपासून प्रसारित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘क्राइम पेट्रोल’मध्ये अजयचा गंभीर अंदाज
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अजय देवगण देशातील वाढत्या गुन्हेगारीबाबत बोलताना दिसतो. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी हा पीडित व्यक्तीच्या परिचयातीलच असतो, या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रोमोमध्ये लक्ष वेधण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये केवळ गुन्ह्यांच्या थरारक कथा दाखवण्यासोबतच प्रेक्षकांना सतर्क आणि जागरूक करण्यावरही भर दिला जाणार असल्याचं दिसतं.
अजयनेही या जबाबदारीबद्दल बोलताना ‘क्राइम पेट्रोल’चं सूत्रसंचालन करणं ही मोठी जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. अनेक वर्षांपासून हा शो गुन्हेगारी घटनांमधून प्रेक्षकांना जागरूक करण्याचं काम करत आहे. नव्या सीझनमध्ये देशाला हादरवून सोडणाऱ्या घटनांवर आधारित कथा आणल्या जाणार असून, घाबरण्याऐवजी नागरिकांनी कोणत्या प्रकारे सतर्क राहावं, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं अजयने सांगितलं आहे.
‘सिंघम’चा आवाज आणि ‘क्राइम पेट्रोल’चा थरार!
एकीकडे अनुप सोनींच्या निवेदनाची वर्षानुवर्षांची सवय असलेले प्रेक्षक, तर दुसरीकडे अजय देवगणचा गंभीर आणि भारदस्त आवाज या दोघांच्या शैलीत मोठा फरक आहे. त्यामुळे अजयच्या एण्ट्रीने ‘क्राइम पेट्रोल’च्या सादरीकरणाला नवा रंग मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः पोलिस आणि गुन्हेगारी कथांशी संबंधित भूमिकांमध्ये अजय देवगणने यापूर्वी निर्माण केलेली स्वतःची वेगळी प्रतिमा पाहता, त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.







