Crime News : गुंडाने चौकीतच उपनिरीक्षकाची कॉलर पकडून केला वार; वाचा सविस्तर…

पुणे – नुकतीच तडीपारी संपलेल्या एका सराईत गुंडाने पोलीस चौकीत उपनिरीक्षकाची कॉलर पकडून फुटक्या मोबाईलने हातावर वार केला. ही घटना कात्रज पोलीस चौकीमध्ये घडली. याप्रकरणी गुंड आणि त्याच्या आईला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार प्रितम चुन्नीलाल परदेशी व त्याची आई सुजाता चुन्नीलाल परदेशी (दोघे रा. कात्रज गांव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव( 32) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रितम हा सराईत गुन्हेगार असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तडीपारीची मुदत संपल्यावर तो पुन्हा कात्रज गावात रहायला आला होता. येथे त्याने पुन्हा रहिवाशांना त्रास देण्यास सुरवात केली होती. त्याच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांनी कात्रज चौकीत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनूसार त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदारांच्या पाठोपाठ प्रितम त्याच्या आईला घेऊन आला. त्यांना उपनिरीक्षक जाधव यांनी शांत रहाण्याचा सल्ला दिला.
मात्र प्रितमने त्यांना तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो, माझ्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, तु या चौकीला नवीन आहेस, आधी माझी माहिती काढ अशी धमकी देऊन जोराने ढकलून दिले. त्याची आई सुजाता हिने त्यांची गणवेशाची कॉलर पकडून तुझ्यासारखे बरेच बघीतलेत, तू काय करणार आमचे माझा मुलगा पण प्रेसमध्ये आहे,
त्याला सांगून तुझी नोकरी घालवते, असे म्हणून शिवीगाळ केली. प्रितम याने त्याच्याकडील फुटलेल्या मोबाईलने उपनिरीक्षक जाधव यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करुन त्यांना जखमी केले . याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात करीत आहेत





