नवी दिल्ली : देशाच्या राजधानीमध्ये दहावीतील मराठी विद्यार्थ्यांने मेट्रो समोर उडी घेऊन आत्महत्या केली. दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून दहावीत शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्याने मंगळवारी आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शौर्य पाटील असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शिक्षिकांनी मानसिक छळ केल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असे शौर्यने दीड पानाच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्रिंसिपल अपराजिता पाल आणि मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस या शिक्षिकेविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे की, दिल्लीच्या गोल मार्केट येथील सेंट कोलंबस शाळेचा विद्यार्थी शौर्य पाटीलने मंगळवारी राजेंद्र नगर मेट्रो स्टेशनच्या प्लेटफॉर्म क्रमांक 2 वरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. प्राचार्य अपराजिता पाल, शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि जुली व्हर्गिस यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असे शौर्यने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. माझ्याप्रमाणे अन्य कोणत्याही विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येवू नये म्हणून चारही शिक्षिकांच्या विरोधात कडक करावी, हीच आपली शेवटची इच्छा आहे, असे शौर्यने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. वडिल प्रदीप पाटील यांच्या तक्रारीवरून राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी प्राचार्या आणि शिक्षिकांविरूध्द गुन्ह्याची नोंद केली आहे. एफआयआरनुसार, 18 नोव्हेंबर रोजी शौर्य नाटकाचा सराव करीत होता. सराव करीत असतानाच पाय मुरगळल्यामुळे शौर्य खाली पडला. मात्र, युक्ती महाजनने तुझा पाय मुरगळला नाही. तू ओव्हर अक्टिंग आणि ड्रामा करीत आहे, अशा शब्दांत सर्वांपुढे सुनावले. शौर्य रडायला लागला. परंतु, तू किती रडलास तरी मला काही फरक पडणार नाही, असे महाजन म्हणाली. यावेळी प्राचार्या अपराजिता पाल उपस्थित होत्या. मात्र, त्या काहीही बोलल्या नाही. चारही शिक्षिका नेहमी अशाचप्रकारे आम्हाला त्रास द्यायच्या. त्यांच्या या जाचाला कंटाळून शौर्यने आत्महत्या केली आहे. महत्वाचे म्हणजे, शौर्य पाटील घरच्या वाहनाने शाळेत ये-जा करीत होता. मात्र, शिक्षिकांच्या अपमानास्पद जाचाला प्रचंड कंटाळल्यामुळे शौर्य घटनेच्या दिवशी गाडी घ्यायला येईल त्यापूर्वीच शाळेतून निघून गेला. मित्रांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो थांबला नाही. मेट्रोत बसला आणि राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर उतरला. येथे दोन-चार मिनिटे थांबला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो काहीही लिहिताना दिसत नाही आहे. यामुळे शाळेतून निघाल्यानंतर सुसाईड नोट लिहिली असावी असा अंदाज आहे.