“शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली, गृहमंत्र्यांचा पोलिसांवर वचक राहिला नाही”

मुंबई – कॉंग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनिधींवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे लक्षण आहे, असे मत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून आमदार डॉ.सातव यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणीही पटोले यांनी केली. डॉ. सातव यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. पटोले पुढे म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदारच खुलेआम दादागिरी करत आहेत, हातपाय तोडण्याची धमकी दिली जाते, गोळीबार केला जातो पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनीधींची सुरक्षा काढून घेतल्या आहेत.
लोकप्रतिनिधींनी काम कसे करावे?
लोकप्रतिनिधींना लोकांमध्ये जावे लागते, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, विविध कार्यक्रमासाठी त्यांना जनतेमध्ये फिरावे लगते, पण असे हल्ले होत असतील तर लोकप्रतिनीधींनी काम कसे करायचे? पोलीस दल व इतर सरकारी यंत्रणा काय फक्त विरोधी पक्षांच्या नेते व लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत आहे का? एका महिला लोकप्रतिनिधीवर हल्ला झाला तरी राज्याच्या गृहमंत्र्याची साधी प्रतिक्रियाही आली नाही हे असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे, असेही पटोले यांनी पुढे म्हटले आहे. आ. डॉ. सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा गावात हल्ला करण्यात आला होता. तत्पूर्वी, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.





