Pune News : तत्कालीन शिक्षण उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा; बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचे प्रकरण

पुणे – बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुण्यातील तत्कालीन शिक्षण उपसंचालक आणि सध्या नंदूरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्य बजाविणार्या अधिकार्यासह त्यांच्या पत्नीवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
आजवरच्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
प्रवीण वसंत अहिरे (वय. ४६), पत्नी स्मिता प्रवीण अहिरे (वय.४१,रा.आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रुपेश जाधव यानी फिर्याद दिली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण अहिरे हे पुण्यात शिक्षण उपसंचालक म्हणून नोकरीस होते. सध्या ते नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून कर्तव्यावर आहेत. त्यांनी संपादीत केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती.
अहिरे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती घेण्यात आली. मार्च २००२ ते फेब्रुवारी २०२० दरम्यानच्या कार्यकाळातील परिक्षण करण्यात आले.
त्यामध्ये त्यांनी त्यांच्या या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी प्रवीण अहिरे यांना त्यांची पत्नी स्मिता यांनी अपप्रेरणा दिली. तसेच गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.




