Pune Crime News : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुन्हा रक्तरंजित खेळी केली आहे. शुक्रवारी (दि. ५ सप्टेंबर) सायंकाळी नाना पेठ परिसरात झालेल्या गोळीबारात गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष (१८) याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आयुष हा नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आईसोबत राहत होता. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो दुचाकीवरून घरी आला. तळमजल्यावर गाडी लावत असताना, आधीपासून दबा धरून बसलेले आरोपी अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील यांनी त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर आयुष्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो घटनास्थळीच कोसळला.





