विना परवानगी कीटकनाशके बनविणाऱ्या कंपनीवर गुन्हा

पिंपरी – शासनाची परवानगी न घेता एका कंपनीने कीटकनाशकाची निर्मिती, साठा आणि विक्री केली. याबाबत कंपनीच्या संचालक मंडळावर तसेच कंपनीत काम नोकरावर गुन्हा दाखल करीत एकास अटक केली. ही घटना हिंजवडी मारूंजी रोडवर घडली.
अमर सुरेश राऊत (वय 31, रा. गायकवाड नगर, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मे. पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. ली. या कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाचे खत निरीक्षक तथा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविशंकर सिद्धेश्वर कावळे (वय 32) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी मारुंजी रोडवर पीसीआय पेस्ट कंट्रोल प्रा. लि. या कंपनीत आरोपींनी शासनाची परवानगी न घेता 27 लाख 94 हजार 185 रुपये किमतीचे कीटकनाशकाचे उत्पादन केले. त्याची साठवणूक करून विक्री देखील केली. हा प्रकार कृषी विभागाच्या निदर्शनास येताच शासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





