Cricketer Pass Away : क्रिकेट विश्वात हळहळ ! ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचं निधन
क्रिकेट जगताला मोठा धक्का देणारी अत्यंत दुर्दैवी घटना (Cricketer Pass Away) समोर आली आहे.

Cricketer Pass Away : क्रिकेट जगताला मोठा धक्का देणारी अत्यंत दुर्दैवी घटना (Cricketer Pass Away) समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या उत्कृष्ट पंचगिरीने ठसा उमटवणाऱ्या आणि झिम्बाब्वेच्या माजी महिला क्रिकेटपटू सारा डाम्बानेवाना (Sarah Dambanevana) यांचं अवघ्या ३६ व्या वर्षी हरारे येथे निधन झालं आहे. ऐन उमेदीच्या काळात आणि कारकीर्द बहरत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने क्रीडाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
झिम्बाब्वे क्रिकेटने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मार्च महिन्यात एका वैद्यकीय प्रक्रियेनंतर सारा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रदीर्घ उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला; मात्र त्यांच्या निधनामागचे (Cricketer Pass Away) नेमके वैद्यकीय कारण अद्याप समोर आलेले नाही.
त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असून, हरारे येथे सुरू असलेल्या एनपीएल (NPL) टी-२० ब्लास्ट सामन्यांपूर्वी खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी एक मिनिटाचे मौन पाळून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
मैदानावर खेळाडू म्हणून ठसा उमटवल्यानंतर पंच म्हणून नवी इनिंग सुरू करणाऱ्या सारा यांनी कमी कालावधीत जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला होता. २ सप्टेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पदार्पण केल्यानंतर त्यांनी यूएईमध्ये पार पडलेल्या २०२४ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आणि त्यानंतर २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात मैदानावरील पंचाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. विशेष म्हणजे, २०२५ च्या महिला वनडे वर्ल्ड कपदरम्यान स्पर्धेच्या इतिहासातील पहिल्या संपूर्ण महिला पंच पॅनेलचा त्या भाग होत्या.
याआधी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पार पडलेल्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यातील निर्णायक लढतीत पंचगिरी करण्याचा ऐतिहासिक मान त्यांनी मिळवला होता. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून उभे राहणाऱ्या त्या झिम्बाब्वेच्या पहिल्या महिला पंच ठरल्या होत्या.
२०२२ मध्ये आयसीसीच्या ‘अंपायर डेव्हलपमेंट पॅनेल’मध्ये स्थान मिळवणाऱ्या सारा यांनी एकूण ६३ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून कर्तव्य बजावले. यात ४२ महिला टी-२०, ११ महिला एकदिवसीय आणि १० पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच बनण्यापूर्वी त्यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघाकडून वेगवान गोलंदाज (Cricketer Pass Away) म्हणून प्रतिनिधित्व केले होते आणि २०११ च्या विश्वचषक पात्रता फेरीतही त्या खेळल्या होत्या. खेळाडू ते आंतरराष्ट्रीय पंच असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या सारा डाम्बानेवाना यांच्या अकाली एक्झिटने क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला आहे.






