Cricket Umpire Dies : क्रिकेटच्या मैदानात धक्कादायक घटना! मधमाशांच्या भीषण हल्ल्यात ६५ वर्षीय पंचांचा मृत्यू
Umpire Dies : एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ६५ वर्षीय अनुभवी पंचांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Cricket umpire dies of bee attack during match : क्रीडा विश्वाला हादरवून टाकणारी एक अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून समोर आली आहे. एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ६५ वर्षीय अनुभवी पंचांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेत काही तरुण खेळाडू आणि दुसरे पंचही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मैदानावर अचानक मधमाशांचा कहर –
उन्नाव येथील सप्रू मैदानावर केडीएमए अंडर-१३ क्रिकेट लीग’ अंतर्गत वायएमसीसी आणि पॅरामाउंट या दोन संघांमध्ये सामना सुरू होता. सामना रंगात आलेला असतानाच अचानक मैदानावर मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मैदानात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला.
पांढऱ्या कपड्यांमुळे पंचांनाच केले लक्ष्य?
या हल्ल्यात मुख्य पंच मानिक गुप्ता (६५) यांना मधमाशांनी अक्षरशः घेरले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पंचांच्या पांढऱ्या कपड्यांमुळे मधमाशांचा थवा त्यांच्याकडे अधिक आकर्षित झाला असावा. साधारण १० मिनिटे मधमाशांनी गुप्ता यांच्या अंगाला वेढा घातला होता आणि त्यांना शेकडो डंख मारले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले दुसरे पंच जगदीश शर्मा आणि काही खेळाडूही जखमी झाले. जगदीश शर्मा आणि जखमी खेळाडूंना तातडीने कानपूरच्या हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
३० वर्षांचा अनुभव अन् करुण अंत
मानिक गुप्ता हे गेल्या ३० वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या (KCA) पंच पॅनेलचे अत्यंत सक्रिय आणि निष्ठावान सदस्य होते. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने शुक्लागंज आणि त्यानंतर कानपूरमधील इन्स्टिट्यूटमध्ये हलवण्यात आले, परंतु विषबाधा गंभीर असल्यामुळे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
केसीएकडून शोक व्यक्त –
या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील क्रिकेट वर्तुळावर शोककळा पसरली आहे. केसीएचे अध्यक्ष संजय कपूर यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “मानिक गुप्ता हे खेळासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते. केसीए परिवार या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.






