क्रिकेट कॉर्नर : उमरानचा दर्जा का घसरला?

– अमित डोंगरे
जम्मू-कश्मीरचा रांगडा गडी उमरान मलिक सध्या कुठे आहे. आयपीएल स्पर्धेतून सनरायझर्स हैदराबाद संघातही दिसत नाही. ती सध्या काय करते याच धर्तिवर तो सध्या काय करतोय असा प्रश्न पडला आहे. त्याच्या गोलंदाजीत वेग होता, बाऊन्स होता त्याची चर्चाही जोरात झाली मात्र, आज त्याचा दर्जा अचानक घसरला कसा. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने आपल्या गोलंदाजीने तहलका केला व त्याची हैदराबादने आयपीएल स्पर्धेत आपल्या ताफ्यात निवड केली. मात्र, त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याचे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला आहे.
अब्दुल रशिद मलिक या फळ विक्रेत्याच्या घरात जन्मलेला उमरान खरोखर दर्जेदार वेगवान गोलंदाज वाटला होता. मात्र, त्याच्या गोलंदाजीची दिशा भरकटेली जेव्हा दिसली तेव्हा लक्षात आले की केवळ वेग असला म्हणजे कोणी महान गोलंदाज होत नाही. मागे खूप वर्षांपूर्वी पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम आक्रम म्हणाला होता की, बीसीसीआय दक्षिण भारतात वेगवान गोलंदाज का शोधते. उत्तरेत शोधा तरच दर्जेदार गोलंदाज मिळतील.
मग आपण उत्तरेत शोध घेतला व आपल्याला इशांत शर्मा, उमेश यादव, महंमद शमी व महंमद सिराज हे हिरे गवसले. यापैकी उमेश काहीसा मागे पडला असला तरीही त्याचा दर्जा टिकवून आहे. इशांतचे निवृत्तीचे वय जवळ आले आहे. शमी व सिराज हेच आपल्या गोलंदाजीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांच्या जोडीला उमरानचेही नाव घेतले जात होते. भारताकडून त्याने 8 एकदिवसीय तर 8 टी-20 सामने खेळले.
प्रमुख गोलंदाजांना विश्रांती दिली गेल्यावर त्याला संधी मिळली. त्यातच जसप्रीत बुमराह दुखापतीने संघाबाहेर असल्याने उमरानला सुवर्णसंधी होती. मात्र, त्याने ती वाया घालवली. अजूनही वेळ गेलेली नाही. आयपीएल काही अंतिम निकष नव्हे त्याने आपल्या कारकीर्दीचा गंभीरपणे विचार केला व झहीर खानसारख्या गोलंदाजाची मदत घेतली तर त्याची गाडी निश्चितच रुळावर येऊ शकते. म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट.





