क्रिकेट कॉर्नर : म्हणूनच म्हणतात सभ्य गृहस्थांचा खेळ

– अमित डोंगरे
जगभरात क्रिकेट हा खेळ काही नवा राहिला नाही. उलट अमेरिकेसारख्या देशांत या खेळाकडे कोणी वळूनही पहात नव्हते त्यांचे संघ आता आयसीसीच्या सहयोगी देशांच्या स्पर्धेत खेळताना दिसत आहे. पण मुळात क्रिकेट हे नाव कसे पडले व याच नावामुळे या खेळाला सभ्य गृहस्थांचा खेळ असे का म्हटले जाऊ लागले. याचा अभ्यास केल्यावर गमतीदार माहिती समोर आली आहे. क्रिकेट या शब्दाचा अर्थ सध्या अस्तित्वात असलेल्या ब्रिटिश नोंदींनुसार खूप वेगळा आहे. इंग्रजांचा तर हा राष्ट्रीय खेळ असल्याने त्याची प्रचंड माहिती उपलब्ध आहे; परंतु सीआरआयसीकेइटी (क्रिकेट) म्हणजे नक्की काय ते पाहू.
सी- कस्टमर फोकस
आर- रिस्पेक्ट फॉर इंड्युजल
आय- इंटेग्रीटी
सी- कम्युनिटी कॉंट्रीब्युशन
के- नॉलेज
इ- इंटरप्रीनरशिप
टी- टीमवर्क
म्हणूनच याला जंटलमन्स गेम असे म्हटले जाते. आता आपल्याकडे जुन्या काळात म्हणजे जेव्हा इंग्रजांमुळे हा खेळ भारतात आला व येथील स्थानिक लोक हा खेळ खेळू लागले तेव्हा इंग्रजी येत नसल्याने या खेळाचे हिंदीत नाव पडले ते गोलगट्टम लकड पट्टम असे काही भागात संबोधले गेल्याचे आढळते. याच्या स्पर्धेलाही हिंदीत दे दनादन प्रतियोगिता असेही बोलले जाऊ लागले.
त्यातूनच पुढे गेंद, बल्ला असे शब्द रूढ झाले. आता या खेळात खरेतर जन्मदात्या इंग्रंजांपेक्षाही आपण भारतीय जास्त प्रगत व मक्तेदार ठरत आहोत. आज तर बीसीसीआय संपूर्ण जागतिक क्रिकेटवर वर्चस्व राखून आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल स्पर्धेतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही काही सामन्यांत हाच सभ्य गृहस्थांचा खेळ बदनाम होताना दिसतो. याला कारण काहीही असो किंवा कोणीही असो खेळ सभ्य गृृहस्थांचा होता, आहे व राहिलाच पाहिजे तरच त्याचे महत्त्व टिकून राहील अन्यथा त्याची ओळखच पुसली जाइल.





