Cricket Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलियानं डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावरील बंदी उठवली, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Cricket Australia (David Warner) : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नरच्या कर्णधारपदावरील आजीवन बंदी उठवली आहे, ज्यामुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला फलंदाज टी-20 बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्सचे नेतृत्व करू शकणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील सँडपेपर वादानंतर वॉर्नरला 2018 मध्ये बंदीचा सामना करावा लागला होता. त्याच्यावर एक वर्ष खेळण्यावरही बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी वॉर्नरसह केपटाऊन कसोटीत गोलंदाज कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावरही चेंडू पिवळ्या सँडपेपरने घासल्याबद्दल (बॉल टॅम्परिंग) बंदी घालण्यात आली होती. 2019 मध्ये त्यानं कमबॅक केलं. पण संघाचं कर्णधारपद काही त्याला भूषवता आलं नाही.
स्वतंत्र समीक्षा समितिने उठवली बंदी….
तीन सदस्यीय स्वतंत्र पुनरावलोकन (समीक्षा) समितीने शुक्रवारी वॉर्नरवरील बंदी उठवली. वॉर्नरवर बंदी घातल्यानंतर सहा वर्षांनी ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वॉर्नर समितीसमोर हजर झाला होता.
समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, “बंदीनंतर वॉर्नरची वागणूक अतिशय सभ्य आणि आदरयुक्त होती. समिती त्याच्या वागणूकीनं प्रभावित झाली आहे आणि आम्हा सर्वांचा असा विश्वास आहे की त्यांनी त्यांच्या वर्तनाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे आणि त्यानं त्याबदल पश्चात्ताप देखील व्यक्त केला आहे.”
David Warner reflected on his on-field conduct following the 2018 Cape Town incident.
His lifetime leadership ban has been lifted. Details: https://t.co/f4HCCSk6eK pic.twitter.com/wg36mVfdEb
— cricket.com.au (@cricketcomau) October 25, 2024
त्यात म्हटले आहे की, “बंदी लागू झाल्यापासून वॉर्नरची वागणूक खूप चांगली राहिली आहे. त्याच्यात बराच बदल झाला असून आता तो विरोधी संघाला चिथावणी देण्याचा किंवा चिडवण्याचा प्रयत्न करत नाही. एकंदरच डेव्हिड वॉर्नरने केलेली चूक आणि त्यानंतर त्याच्या आचरणात झालेला बदल लक्षात घेऊन समितीने हा निर्णय घेतला आहे.
वॉर्नरची कारकिर्द…
वॉर्नरने शेवटची कसोटी पाकिस्तानविरुद्ध जानेवारीमध्ये खेळली होती. आता तो एकदिवसीयही खेळणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. वॉर्नरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 112 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 110 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 44.6 च्या सरासरीने 8786 धावा, एकदिवसीय सामन्यात 45.01 च्या सरासरीने 6932 धावा आणि टी-20 मध्ये 142.48 च्या स्ट्राईक रेटने 3277 धावा केल्या आहेत. वॉर्नरने कसोटीत 26 शतके आणि 37 अर्धशतके, वनडेमध्ये 22 शतके आणि 33 अर्धशतके, टी-20मध्ये एक शतक आणि 28 अर्धशतके केली आहेत.





