Shailaja More: स्मशानभूमीत समस्यांचा डोंगर; नगरसेविका शैलजा मोरे यांचा स्मशानभूमी पाहणी दौरा
Shailaja More: स्मशानभूमीत कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचीही कमतरता

पिंपरी – अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना सन्मानजनक आणि सुरक्षित सुविधा मिळणे अपेक्षित असताना शहरातील अनेक स्मशानभूमींची दूरवस्था झाल्याचे समोर आले आहे. माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका शैलजा मोरे यांनी मंगळवारी शहरातील विविध स्मशानभूमींना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली.
निगडी, किवळे, मामुर्डी, चिंचवड-केशवनगर आणि देहूरोड-शितळानगर येथील स्मशानभूमींमध्ये गळकी छते, अपुरी प्रकाशव्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा अभाव, नादुरुस्त स्वच्छतागृहे, सुरक्षा साधनांची कमतरता, अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने या समस्या दूर करुन नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे छत गळत असून ट्रॉलीमुळे मृतदेह खाली पडण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षा भिंत, पिण्याचे पाणी, पेव्हिंग ब्लॉक, अस्थी ठेवण्यासाठी कलश, स्वच्छता आणि प्रकाशव्यवस्थेचाही अभाव आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा किट, मास्क आणि गणवेश मिळत नसल्याची तक्रार आहे. दीर्घकाळ सेवा करूनही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यात आले नसल्याने त्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
किवळे येथे स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, पिण्याचे पाणी, प्रकाशव्यवस्था आणि सभामंडपाची सुविधा अपुरी आहे. परिसरात गवत आणि कचरा वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पत्राशेड वाकले असून नदीकाठच्या भागात पेव्हिंग ब्लॉकचीही आवश्यकता आहे. ड्रेनेज नदीत सोडण्यात आल्याचा मुद्दाही यावेळी समोर आला.
मामुर्डी स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांची कमतरता, गळके छत, अपुरी स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि प्रकाशव्यवस्थेचा अभाव आहे. नदीकाठच्या पायऱ्यांवर सुरक्षा ग्रील नसल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेश विसर्जन घाट आणि स्मशानभूमी एकाच ठिकाणी असल्याने तेथे मद्यपान करणारे बसत असल्याचेही पाहणीत निदर्शनास आले.
चिंचवड-केशवनगर येथील विद्युत दाहिनी परिसरात स्वच्छतागृह नादुरुस्त असून पिण्याचे पाणी, शेड, पंखे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था उपलब्ध नाही. पायऱ्यांना सुरक्षा ग्रील नसून परिसरात कचरा साचलेला आहे. अंत्यविधीनंतर नागरिकांना उघड्यावर अंघोळ करावी लागत असल्याने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
वीज बिल थकल्याने विद्युत दाहिनी बंद
देहूरोड-शितळानगर येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी तब्बल ८ लाख ५० हजार ३६० रुपयांचे वीजबिल थकीत असल्याने बंद असल्याचे समोर आले. स्मशानभूमीत कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांचीही कमतरता आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व समस्यांवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून प्रत्येक स्मशानभूमीची दुरुस्ती आणि आवश्यक सुविधा कालबद्ध पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मोरे यांनी केली.
“शहरातील विविध स्मशानभूमींची पाहणी करताना समोर आलेल्या समस्या केवळ किरकोळ दुरुस्तीच्या नसून नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाशी संबंधित आहेत. त्यामुळे पाहणी दौरा केवळ पाहणीपुरता मर्यादित न ठेवता प्रशासनाने प्रत्येक स्मशानभूमीतील समस्यांची तातडीने नोंद घेऊन कालबद्ध पद्धतीने दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.” – शैलजा मोरे, माजी उपमहापौर तथा नगरसेविका, प्रभाग क्रमांक १५
Shivendra Raje Bhosale: शिवेंद्रसिंहराजेंच्या बदनामीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार





