Credit society scam: आळंदीच्या ‘अमृतानुभव’ पतसंस्थेत 11 कोटींचा अपहार; सामान्य ठेवीदारांच्या पैशांवर दरोडा
Credit society scam: व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट सोने तारण कर्जाद्वारे फसवणूक

Credit society scam: तीर्थक्षेत्र आळंदी येथील चावडी चौक परिसरात असलेल्या ‘अमृतानुभव नागरी सहकारी पतसंस्थेत ११ कोटी ३ लाख १३ हजार ३८० रुपयांचा अवाढव्य आर्थिक अपहार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी आळंदी पोलिसांनी पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक, सोनार आणि त्यांच्या साथीदारावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून, या घटनेमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
असा झाला अपहार –
पतसंस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक बाळू अर्जुन पवार याने पदाचा गैरवापर करत आरोपी ऑडिटर संजय लांडगे, सोनार पूर्णानंद खोल्लम यांच्याशी संगनमत केले. आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि बनावट कर्जदार उभे करून त्यांना सोने तारण कर्ज मंजूर झाल्याचे भासवले.
प्रत्यक्षात कोणतेही सोने गहाण न ठेवता किंवा बनावट अहवाल सादर करून कर्जाची कोट्यवधी रुपयांची रक्कम परस्पर लाटली. या कटात पतसंस्थेचे सोनार आणि ऑडिटर यांनीही खोटे अहवाल देऊन संचालक मंडळाची दिशाभूल केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू –
पतसंस्थेचे संचालक मंडळाचे अध्यक्ष संजय जयसिंग शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
हा अपहार २४ नोव्हेंबर २०२५ पूर्वीच्या काळातील असून काल (२३ जानेवारी) रात्री उशिरा याप्रकरणी तक्कार दाखल झाली. या प्रकरणात आरोपी संजय लांडगे आणि पूर्णानंद खोलम यांना अटक झालेली असून पोलीस आता मुख्य आरोपी बाळू पवारचा शोध घेत आहेत.
पतसंस्थांमधील अपहार, ठेवीदारांचे मरण –
गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात नागरी सहकारी पतसंस्थांमधील आर्थिक अपहारांच्या घटनांचे पेव फुटले आहे. राज्यात अनेक मोठ्या पतसंस्थांमध्ये कोट्यवधींचे घोटाळे उघड झाले आहेत. ‘बनावट सोने तारण’, ‘बोगस कर्ज वाटप’ आणि ‘संचालक मंडळाची मनमानी’ ही या घोटाळ्यांमागची मुख्य कारणे ठरत आहेत.
ठेवीदारांची असुरक्षितता:
विश्वासाला तडा: सामान्य कष्टकरी, पेन्शनधारक आणि शेतकरी आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहील या विश्वासाने पतसंस्थेत ठेवतात. मात्र, अशा अपहारांमुळे हा विश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे.
अपुऱ्या तरतुदी: बँकांच्या तुलनेत पतसंस्थांमधील ठेवींना असलेले विमा संरक्षण अत्यंत मर्यादित असते, ज्यामुळे संस्था बुडाल्यास ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणे कठीण होते.
व्यवस्थेचे अपयश: वारंवार होणारे हे अपहार सहकार विभागाच्या ऑडिट प्रक्रियेवर आणि देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
आळंदीतील ही घटना केवळ एका संस्थेची फसवणूक नसून, सहकार चळवळीला लागलेली ही कीड सामान्य माणसाच्या भविष्यासाठी अत्यंत घातक ठरत आहे.





