PM Narendra Modi : सकारात्मक बदलासाठी सर्जनशीलता हा एक मंच ! PM मोदींच्या हस्ते पहिले राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान

Narendra Modi – राष्ट्रीय सृजक पुरस्कार हा कथाकथन, सामाजिक बदलाचे समर्थन, पर्यावरणीय स्थैर्य, शिक्षण आणि गेमिंग यासह सर्व क्षेत्रांतील उत्कृष्टता आणि प्रभाव यांचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी एक मंच म्हणून या पुरस्काराची कल्पना पुढे आली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आज त्यांच्या हस्ते पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान केला. यावेळी त्यांनी पुरस्कार विजेत्यांशी संवादही साधला.नरेंद्र मोदी म्हणाले, कालौघात झालेले बदल आणि नव्या युगाच्या उदयाच्या बरोबरीने चालणे ही देशाची जबाबदारी आहे.
देश आज प्रथमच राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान करून ती जबाबदारी पार पाडत आहे. राष्ट्रीय सृजक पुरस्कार नवीन युगाला त्याची सुरुवात होण्याआधीच ओळख देत आहेत. नवीन युगाला ऊर्जा देऊन आणि तरुणांच्या सर्जनशीलतेचा आणि दैनंदिन जीवनातील बाबींप्रति त्यांच्या संवेदनशीलतेचा आदर करून राष्ट्रीय सृजक पुरस्कार आगामी काळात मोठा प्रभाव निर्माण करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यात, राष्ट्रीय सृजक पुरस्कार आशय निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत बनतील आणि त्यांच्या कार्याची ओळख निर्माण करतील. पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि अतिशय कमी वेळेतील स्पर्धकांच्या सक्रिय सहभागाचीही प्रशंसा केली. या कार्यक्रमासाठी 2 लाखांहून अधिक सर्जनशील मनांचे एकत्रित येणे देशाची स्वतःची ओळख निर्माण करत आहे, यावर त्यांनी भर दिला.





