वेड आकाश कंदीलाचे

दसरा सण झाला की दिवाळ सणाचे वेध लागतात आणि दिवाळी जवळ आली की बाजारपेठा रंगीबेरंगी आकाश कंदीलाने सजतात. मग शोध सुरू होतो आपल्या घराला शोभा देणाऱ्या आकाश कंदीलाचा. विविध रंगांचे, आकाराचे आणि विविध प्रकारचे आकाश कंदील लक्ष वेधून घेतात. ते प्रकाशमान दिव्यांनी नटलेले असतात. कंदीलांच्या या गर्दीत पारंपरिक आकाश कंदीलाचा शोध पुष्कळसे लोक घेतात. या आधुनिक काळात त्यांचे आकर्षण आजही टिकून आहे.
दिवाळीच्या विविध जाहिरातींमध्ये पारंपरिक आकाश कंदीलाचीच छाप वर्तमानपत्रा प्रमाणे टीव्ही आणि सामाजिक माध्यमातून प्रकर्षाने दिसून येते. हीच छाप गेली कित्येक वर्षे मनामनात कोरली गेलेली आहे.
असे पारंपरिक आकाश कंदील आज रेडीमेड मिळतात. याचे कारण कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादनाचे तंत्र विकसित झाले आहे. मात्र सत्तरच्या दशकात रेडीमेड आकाश कंदील गावात तरी पाहायला मिळायचे नाहीत. ते हातानेच बनवावे लागत असत. चांदणी, आकाश कंदिल, विमान आणि असेच काही मोजकेच प्रकार लहानपणी आम्ही हाताने बनवत असू. ते बनविताना कराव्या लागणाऱ्या धडपडी व त्यातून यशस्वीपणे आकाराला आलेला आकाश कंदिल पाहताना होणारा आनंद अवर्णनीय असे. मी स्वतः तो प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. त्यावेळचा पारंपारिक आकाश कंदिल बनविण्याचा छंद मी आजही जपला आहे. या छंदाला दुसरे नाव वेड असेच आहे.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी माझ्या तारळे गावात आकाश कंदील घरोघरी असे नसायचे. गल्लीत एखादा दुसराच पाहायला मिळायचा. ज्यांच्या दारात असे त्याचा मला हेवा वाटे. माझा एक मित्र दारात बांबूच्या कांब्यांनी बनविलेली एक चांदणी लावायचा. छान होती ती. संपूर्ण चांदणी गुलाबी रंगाच्या जिलेटीन पेपरने मढविलेली असायची. गुढ्या उभारतात तशी ती एका उंच कळकाला लटकवलेली. त्यात फक्त एक मिणमिणती पणती. त्या काळोखातही ती उठून दिसायची. आपल्यालाही अशी चांदणी बनवता आली तर किती मजा येईल असे वाटायचे आणि ती यायला हवी अशी तीव्र इच्छा होत असे. मला शिकवशील काय रे चांदणी बनवायला? असे मित्राला बोलायचा अवकाश की त्याने लगेच होकार भरला. त्याच्या मदतीने मी ती तयारही केली. छानपैकी आकाराला आलेली ती चांदणी पाहून मला अति आनंदाने वेड लागायचेच बाकी होते.
ह्याच माझ्या मित्राने पुढच्या वर्षी चांदणी ऐवजी पारंपरिक आकाश कंदिल बनविण्याचे ठरविले. त्यावर्षी आम्ही दोघांनीही आकाश कंदिल (पारंपरिक) बनविण्याचा घाट घातला. कैकाडी आळीला कळकाच्या (बांबूच्या) कणगी, टोपल्या, सुपली बनविण्याचा व्यवसाय चालतो. तिथून आकाश कंदिलासाठी लागणाऱ्या काड्या (कांब्या) आम्ही घेऊन आलो. त्यासाठी लागणारा जिलेटीन पेपर, पतंगाचा कागद, दोरा, डिंक असे मोजकेच साहित्य आणले. या सगळ्यांसाठी येणारा खर्च अत्यंत माफक असा होता. म्हणजे अवघे तीन चार रूपये. पण हे सगळे साहित्य आणताना वाटणारा आनंद आणि उत्साह हा अमाप होता आणि प्रत्यक्ष आकाश कंदिल बनविताना वाटणारा आनंद हा गगनात मावायचा नव्हता. असा तयार केलेला आकाश कंदील घरावर लावताना तर एखादा गड जिंकल्यासारखे वाटायचे. या पारंपरिक आकाश कंदीलाची प्रचंड आवड यावेळी निर्माण झाली. तेव्हा पासून आकाश कंदिलाचे भूत डोक्यात बसले ते आज अडुसष्टाव्या वर्षीही डोक्यातून बाहेर आले नाही.
शालेय जीवनात दरवर्षी दिवाळीची सुट्टी लागली रे लागली की आकाश कंदिल बनविण्याची लगबग सुरू व्हायची. नंतर नंतर तर आम्ही दहा बारा मित्र एकत्र येऊन तो बनवित असू. आता तर सेवा निवृत्ती नंतर कायमची सुट्टी आहे. दसरा झाला की मी आकाश कंदीलाच्या मागे लागतो. आकाश कंदील बनविताना माझा हात उत्तम चालतो पण तो बसून करावयाचा असल्याने गुढग्यांना होणाऱ्या वेदना सहन करून मी हा आनंद अक्षरशः लुटतो. मागच्या व पुढच्या दारासाठी एक एक आणि घरात टीव्ही समोर अगदी छोटा आकाश कंदील अशा एकूण तीन आकाश कंदीलांची निर्मिती मी अत्यंत उत्साहाने करतो. प्रत्यक्ष विकतच्या कंदीलापेक्षा स्वतः बनविताना येणारा खर्च दुप्पट तिप्पट होतो. पण हाताने बनविताना वाटणारा आनंद हा अवर्णनीय आहे. पण काही मंडळींना माझ्या या वेडाचे आश्चर्य वाटते. तर काही जण म्हणतात या उतार वयात रिमोट हातात घेऊन टीव्ही पाहायचा सोडून असल्या उचापती कशाला करत बसता? टीव्ही पाहायला अख्खे बर्ष पडलेले असते. पण हे दहा पंधरा दिवस कसे निघून जातात ते कळतच नाही. हीच खरी माझी दिवाळी असते. तुम्हा मंडळींची ही दिवाळी पाच सहा दिवसांची असते पण हीच माझी दिवाळी दहा पंधरा दिवसांची असते. कारण आकाश कंदील हा दिवाळीत माझ्या घराचा खरा दागिना असतो. तो आकाश कंदील घरावर लावल्यावर पाहताना मिळणारा आनंद आकाशातही मावणारा नसतो. हे वेड आकाशकंदीलाचे हातपाय चालताहेत तो पर्यंत चालतच राहणार आहे. शुभ दीपावली!





