Crane Accident – तळवडे येथील जोतिबा मंदिरासमोर गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता एक मोठी क्रेन रोहित्रावर कोसळल्याने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. ही क्रेन २२ केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनला येणाऱ्या वाहिनीवर पडल्याने या ८ हजार ६१० ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनमधून देहूगाव व तळवडे या २२ केव्ही वाहिन्या बाहेर पडतात. या वाहिनीवर १९१० औद्योगिक आणि ६७०० घरगुती ग्राहक आहेत. या सर्वांना या बिघाडाचा फटका बसला आहे. क्रेनने एक रोहित्र व काही खांब जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. संबंधित क्रेन मालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. सोबतच महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. तुटलेले खांब आणि तारा बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले होते. मात्र, या कामाला उशीर झाल्याने दिवसभर संपूर्ण उद्योग ठप्प झाले होते. त्यामुळे उद्योगांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर तीव्र उन्हाळ्यात दिवसभर वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.