माळेगाव : माळेगाव परिसरात अवैध गावठी दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग बारामती यांच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १० आरोपींना ताब्यात घेऊन १४.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २२९५ लिटर गावठी दारू, तीन दुचाकी, तीन चारचाकी वाहने, आणि एक टेम्पोचा समावेश आहे. सुग्रीव अंकुश भंडलकर व सिताराम अंकुश भंडलकर (रा. खांडज, ता. बारामती), नवनाथ सदाशिव गव्हाणे (रा. माळेगाव खुर्द), काशिनाथ सुरेश चव्हाण (रा. वरळेगाव, पो. बोरमणी, जि. सोलापूर), सागर अशोक गव्हाणे व दत्तात्रय विजय गिरे (रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), आकाश नामदेव पवार (रा. वडजी तांडा, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दुय्यम निरीक्षक गिरीषकुमार कर्चे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाहुणेवाडी, ढवळेमळा आणि तुकाई माळ (माळेगाव खुर्द) येथे गावठी दारू विक्रीसाठी काही जण चारचाकी वाहनांतून येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे टेम्पो क्र. MH13 EP0150 आणि कार क्र. MH12 FU0414 ताब्यात घेण्यात आली. या वाहनांमधून १९१० लिटर गावठी दारू आणि ११.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिर्के, दुय्यम निरीक्षक गिरीषकुमार कर्चे, तसेच सागर साबळे, मनोज होलम, निखिल देवडे, सुरेश खरात आणि सागर दुबळे यांच्या पथकाने केली.